मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Wednesday, 30 September 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

सोमेश्वरचा रणसंग्राम पेटला; दादांच्या विचारांना फारकत? स्वतंत्र पक्षाच्या घोषणेने राजकीय भूकंप!

mnewsmarathi 30 Sep 2026 1 मिनिट वाचन 3,596 वाचन

प्रतिनिधी

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दिवसागणिक नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस नाट्यमय घडामोडींचा ठरला. कारखान्याचे विद्यमान चेअरमन यांनी अचानक स्वतःच्या स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने, त्यांनी अजित पवारांच्या विचारांना थेट तिलांजली वाहिल्याची चर्चा आता सभासदांमध्ये जोरदार रंगू लागली आहे.

​अजित पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्याकडे पाहिले जायचे. अजित पवारांनीही त्यांच्यावर निष्ठा दाखवत तब्बल १३ वर्षांपेक्षा जास्त काळ सोमेश्वरच्या चेअरमनपदाची धुरा त्यांच्याकडेच सोपवली होती. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर जगताप यांनी वानेवाडी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेत स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने सोमेश्वरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

चेअरमन यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे सोमेश्वरची निवडणूक आता थेट तिरंगी लढतीकडे झुकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे सत्ताधारी राष्ट्रवादी, दुसरीकडे विरोधक आणि आता चेअरमन यांचे स्वतंत्र पॅनेल, अशा या तिहेरी सामन्यामुळे निवडणुकीतील चुरस प्रचंड वाढली आहे.

ऐनवेळी झालेल्या या बंडखोरीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या निवडणुकीत नेमकी काय रणनीती आखणार? बिघडलेली समीकरणे सावरण्यासाठी काय पावले उचलली जाणार? याकडेच आता संपूर्ण सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.

​सोमेश्वरची ही बहुचर्चित मतदान प्रक्रिया ११ ऑक्टोबरला पार पडणार असून १२ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. या रणसंग्रामात सभासदांचा कौल नेमका कुणाच्या पारड्यात पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi