प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या मोटारसायकल चोरीचा गुन्हा वडगाव निंबाळकर पोलिसांनी उघडकीस आणला असून, याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 209/2026, भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7.30 ते रात्री 11.30 वाजण्याच्या दरम्यान, वडगाव निंबाळकर येथील श्रवण रेस्टॉरंट अँड परमिट रूम बिअर बारसमोरील पार्किंगमध्ये फिर्यादी अभिजित चंद्रकांत घोडके, रा. वडगाव निंबाळकर यांनी त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. MH-42-AC-7749, हँडल लॉक करून पार्क केली होती. अज्ञात इसमाने सदर मोटारसायकलचे हँडल लॉक तोडून ती चोरी करून नेली होती.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी तपासाच्या आधारे अजिंक्य जितेंद्र मोरे (वय 20, रा. जिंती, ता. फलटण, जि. सातारा) व अक्षय जनार्दन कांबळे (वय 31, रा. जिंती, ता. फलटण, जि. सातारा) यांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपींकडून गुन्ह्यात गेलेली स्प्लेंडर प्लस मोटरसायकल नंबर MH42AC7749 व गुन्ह्यात वापरलेली TVS Star सिटी मोटारसायकल क्र. MH-11-AQ-6593 असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई सपोनी जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खांडेकर/2088, पोलीस शिपाई आबा जाधव व पोलीस शिपाई नरेंद्र यादव यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
वाहन चोरीच्या घटना रोखण्यासाठी नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत तसेच वाहनाला हँडल लॉकसोबत अतिरिक्त सुरक्षा साधनांचा वापर करावा, असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
