प्रतिनिधी
पुणे : विश्रांतवाडी परिसरातील भीमनगर येथे दुचाकी पार्किंगच्या किरकोळ कारणावरून वाद घालत लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखा, युनिट-४च्या पथकाने तातडीने ताब्यात घेतले.
सोमवारी (५ ऑक्टोबर) रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखा युनिट-४चे पथक विश्रांतवाडी परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिस हवालदार साबळे व दुसिंग यांना गोपनीय बातमीदारामार्फत भीमनगर परिसरात काही मुलांनी दुचाकी पार्किंगच्या वादातून कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण केल्याची माहिती मिळाली.
माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस हवालदार साबळे यांनी एका अल्पवयीन मुलाला कोयत्यासह ताब्यात घेतले. त्यानंतर सहायक पोलिस फौजदार हरीश मोरे, पोलिस हवालदार दुसिंग, आव्हाड आणि खराडे यांच्या मदतीने सापळा रचून पळून गेलेल्या अन्य दोन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले.
तिन्ही मुले अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर बाल न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ मधील तरतुदींनुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यांना पुढील कार्यवाहीसाठी विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास विश्रांतवाडी पोलिस करीत आहेत.
