प्रतिनिधि
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील विविध शासकीय आस्थापना मध्ये सर्व सामान्य जनतेच्या कामास होत असलेली दिरंगाई आणि हेळसांडपणाच्या विरोधात युवासेना इंदापूरच्या वतीने युवासेना जिल्हा सरचिटणीस सुरज सानप, उप तालुका युवा अधिकारी अक्षय पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रशासकीय प्रमुख या नात्याने मा.निवासी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे साहेब यांना काही मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने महसूल व वन विभाग, कृषी विभाग, कृषी पशुसंवर्धन,दुग्ध व मत्स्य व्यवसाय विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, विधी व न्याय विभाग, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, या सर्व विभागातील अधिकारी/कर्मचारी यांनी शासनाने नेमून दिलेल्या वेळेत उपस्थित राहून कामकाज करणे आवश्यक असून महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियम २०१५ करणे क्रमप्राप्त आहे तसेच आपल्या विभागाची नागरी सनद कार्यालयाच्या दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे तसेच या सनदीनुसार विहीत मुदतीत कामाचा निपटारा करणे बंधनकारक आहे.
इंदापूर तालुक्यातील बहुतांश भाग हा दुर्गम असून तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ मोठे आहे.इंदापूर हे तालुक्याचे प्रशासकीय ठिकाण असल्याने या ठिकाणी सर्व कामांसाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. परंतु अनेक वेळा शासकीय अधिकारी/कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्याने किंबहुना कामाचा निपटारा वेळेत करत नसल्याने सर्व सामान्य नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात.यामुळे त्यांच्या वेळेचा अपव्यय आणि आर्थिक नुकसान होते. या विरोधात युवासेना इंदापूर तालुक्याच्या वतीने तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचा कारभार सुरळीत चालावा, अधिकारी/कर्मचारी यांनी शासनाने नेमून दिलेल्या वेळेचे पालन करावे, तसेच विभागाच्या कार्यालयाने आपल्या नागरी सनदेचे फलक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावून शासनाने नेमून दिलेल्या मुदतीत प्राप्त प्रकरणावर कारवाई करावी आणि तहसीलदार कचेरीच्या ठिकाणी तक्रार पेटी निर्माण करून सर्व सामान्य जनतेचा त्रास दुर करावा अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.