प्रतिनिधी
मतदार नोंदणी प्रक्रिया आणि मतदार जनजागृती अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून गौरविण्यात येणार आहे. येत्या २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्याने मतदार नोंदणी आणि मतदार जागृतीसाठी घेतलेल्या पुढाकाराचा राज्यात गौरव झाला आहे. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्यासोबत उत्कृष्ट कामगिरी करणारे उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून श्रीमती आरती भोसले आणि श्रीमती मृणालिनी सावंत यांचीही निवड करण्यात आली आहे.
युवक, महिला, दिव्यांग मतदार, तृतीयपंथी, देहविक्री व्यवसायातील महिला, औद्योगिक क्षेत्रातील मतदार आदींच्या मतदार नोंदणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी विविध कल्पना राबवल्या. मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये शिबिरे आयोजित केली. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासह संयुक्त विद्यमाने शाळा व महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता संघांच्या बळकटीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
जिल्ह्यात मतदार शिक्षणाचे कार्यक्रम वर्षभर घेण्यात आले. राष्ट्रीय मतदार दिन, संविधान दिन, शिक्षक दिन, महिला दिन तसेच आंतरराष्ट्रीय युवा दिन आदी दिवशी शाळा-महाविद्यालयांमध्ये मतदार जागृतीचे कार्यक्रम घेत मतदार नोंदणी करण्यात आली.
२५ जानेवारी रोजी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एस.एन.डी.टी.) विद्यापीठ, चर्चगेट मुंबई येथे होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांना भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कल्पनांचा अवलंब केल्याबद्दल देण्यात येणारे देशपातळीवरील ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवॉर्ड’ही नुकतेच घोषित केले आहे.
0000