प्रतिनिधी
*देशाच्या विकासासाठी महिलांना अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात सहभागी करावे लागेल-उपमुख्यमंत्री*
पुणे दि. २५: जगातील प्रगत देशांनी महिलांना अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात आणि सामाजिक प्रवाहात सामावून घेतल्याने त्यांची प्रगती वेगाने झाली. आपल्यालाही देशाचा विकास वेगाने साधण्यासाठी महिलांना अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात सहभागी करावे लागेल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भोसरी येथील गावजत्रा मैदानावर शिवांजली सखी मंच आयोजित इंद्रायणी थडी जत्रेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार महेश लांडगे, आमदार राहुल कुल, आमदार उमा खापरे, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, माजी खासदार अमर साबळे, शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार जगदीश मुळीक, शरद सोनवणे, बापू पठारे, पद्मश्री गिरीश प्रभुणे आदी उपस्थित होते.
इंद्रायणी थडी कार्यक्रम मातृशक्तीला समर्पित करण्यात आल्याबद्दल आमदार लांडगे यांचे कौतुक करून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जगाच्या पाठीवर प्रगत देशांचा विकास मातृशक्तीच्या क्षमता ओळखल्याने झाला. त्यांनी या मानव संसाधनाचा उपयोग देशाच्या संचलनात करत देशाच्या अर्थव्यवस्थेत सामावून घेतले. त्यामुळे त्यांच्या विकासाचा वेग दुपटीने-तिपटीने वाढला आणि ते सर्व देश प्रगत झाले. त्यामुळे आपल्यालाही महिलांना या सर्व व्यवस्थेत सामावून घ्यावे लागेल.
प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी बेटी बचाव, बेटी पढाव च्या माध्यमातून महिलांच्या विकासाला चालना दिली. स्टार्टअपच्या माध्यमातून विकास होत असून त्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात ५० टक्के महिला आहेत. त्यांनी कर्ज मिळवून अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवसाय उभा केला आहे. या जत्रेच्या माध्यमातून एक हजार महिला बचत गटांना स्टॉल्स देणे महत्वाची बाब आहे. महिला बचत गट चळवळीमुळे अनेक महिलांना बचत गटाशी जोडून त्यांना विविध काम देण्यात आले आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ किंवा इतर शासकीय योजनांमध्ये महिला बचत गटांना दिलेले कर्ज शंभर टक्के परत येते. कारण महिलांना पैशाचे महत्व माहित आहे, त्या पैशाचा योग्य उपयोग करतात. व्यवस्थापनाचा उपजत गुण त्यांच्यात असतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना त्या पैशाचे योग्य नियोजन करतात. त्यामुळे अशा महिलांना बचत गटाशी जोडले तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
इंद्रायणी थडी जत्रेमुळे महिलांना रोजगार वाढविण्यासाठी संधी मिळण्यासोबत व्यवसाय वाढविण्यासाठी पैसा मिळेल, प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केल.
*इंद्रायणी थडी जत्रेच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचे संवर्धन*
अनेक गावे मिळून पिंपरी-चिंचवड शहर झाले आहे. जत्रेच्या माध्यमातून गावातील मातीचा सुगंध इथल्या नागरिकांमध्ये पहायला मिळतो, गावांमध्ये पहायला मिळतो. तो मातीचा सुगंध जीवंत ठेवण्याचे काम जत्रेच्या माध्यमातून होत आहे. बचत गटातील महिलांना प्रोत्साहन देण्यासोबत ग्रामीण संस्कृती आणि आपल्या पारंपरिक संस्कृती आणि कलांचे संवर्धन करण्याचे कार्य होत आहे. अतिशय सुंदर ग्रामीण संस्कृती जत्रेत उभारण्यात आली आहे, अशा शब्दात श्री.फडणवीस यांनी आयोजनाचे कौतुक करत जत्रेला शुभेच्छा दिल्या. परिसरातील नागरिकांना आनंद देणारी जत्रा असल्याचे ते म्हणाले.
पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, इंद्रायणी थडी जत्रेमुळे २० हजार महिलांना रोजगार मिळाला आहे. गावातील संस्कृती टिकावी म्हणून त्याचे प्रदर्शन जत्रेत करण्यात आले आहे. बचत गटातील महिलांना बाजारपेठ मिळाल्याशिवाय प्रोत्साहन मिळणार नाही. या जत्रेमुळे असे प्रोत्साहन देण्याचे कार्य झाले आहे.
आमदार लांडगे म्हणाले, दोन वर्षानंतर या जत्रेचे आयोजन होत आहे. जत्रेच्या माध्यमातून २० हजार महिलांना व्यवसायाची संधी मिळते आहे. सुमारे हजार बचत गटांना यानिमित्ताने बाजार उपलब्ध झाला आहे.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते इंद्रायणी थडी जत्रेतील ग्राम संस्कृती प्रदर्शन केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले.