प्रतिनिधी
मुंबई, दि. 30 : भरडधान्य हे अन्नाचा एक महत्वाचा स्त्रोत असून खाद्यपदार्थ म्हणून त्याची निवड करणे काळाची गरज आहे. भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन त्याचे ब्रँडिंग करणे गरजेचे असून त्यासाठी ही आंतरराष्ट्रीय परिषद महत्वाची ठरणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
आज मुंबईत रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये दोन दिवसांची आतंरराष्ट्रीय भरडधान्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत बोलत होते.
मंत्री श्री.पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत, सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या प्रस्तावाला जगभरातील अनेक देशांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे भरडधान्याच्या योगदानाचे महत्व, आणि पोषक आरोग्यदायी आहार म्हणून त्याची उपयुक्तता याबद्दल जनजागृती करण्यात येत असून याचाच भाग म्हणून या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेमुळे आरोग्यदायी आहारामध्ये भरडधान्याचे महत्व आणि उपयुक्तता याबाबत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना माहिती आणि या क्षेत्रात संशोधन करण्यास प्रोत्साहन मिळेल, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
या उद्घाटनप्रसंगी रामनारायण रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनुश्री लोकूर, पद्मश्री खादर वल्ली, व्यवस्थापकीय परिषदेचे अध्यक्ष एस.पी. मंडळी, अॅड. एस. के. जैन, श्रीकृष्ण चितळे, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष अॅड.मिहीर प्रभुदेसाई, प्रा. कामिनी दोंदे, उपप्राचार्य डॉ.वर्षा शुक्ला तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.