प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची आर्थिक पत ढासळल्याची शंका उपस्थित करणाऱ्या शेतकरी कृती समितीच्या अध्यक्षांनी सभासदांचा खोटा कळवळा दाखविण्यापुर्वी कारखान्याच्या मालकीचे चोरलेले मु.सा. काकडे महाविद्यालय पहिल्यांदा सभासदांच्या ताब्यात द्यावे व त्यानंतर कारखान्याच्या हिताच्या गप्पा माराव्यात असे आव्हान श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
श्री.जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हंटले आहे की, नुकतेच शेतकरी कृती समितीने कारखान्याने जी शेअर्सची रक्कम कपात केली आहे त्याविरोधात काटाबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. परंतू श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेने ऊस क्षेत्राच्या प्रमाणावर शेअर्स धारण करणेबाबत बहुमताने निर्णय घेतलेला असून त्यानुसार सभासदांचे ऊस बीलातून वाढीव शेअर्सची रक्कम कपात करणेत येत आहे. कोणत्याही सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ही सर्वश्रेष्ठ असून आपल्या कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेअर्सची रक्कम कपात करण्याचा निर्णय बहुमताने इ आला असतानाही या निर्णयास विरोध करुन श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा काटा बंद करण्याचा इशारा शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतिश काकडे यांनी दिला आहे. त्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभेपेक्षा शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष श्रेष्ठ आहेत का असा सवालही श्री जगताप यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निर्णयानुसार आपण शेअर्सची कपात करीत आहोत.
श्री. जगताप पुढे म्हणाले की, सभासदांच्या शेअर्सची किंमत दहा हजार रुपयांवरून पंधरा हजार रुपये करणेचा निर्णय हा वार्षिक सर्वसाधारण सभेने घेतलेला आहे हा कृती समितीचा आरोप चुकीचा, अपुऱ्या माहितीच्या आधारे सभासदांची दिशाभुल करणारा असून प्रत्यक्षात हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. कृती समितीचे नेते दुसरीकडे आर्थिक चणचणीमुळे ऑगस्ट २०२२ मध्ये कारखान्याने शेअर्सची कपात केल्याचा आरोप करीत आहेत त्यांचा हा आरोप बिनबुडाचा असून कारखान्याला आर्थिक चणचण भासण्याचे काहीच कारण नाही. आपल्या कारखान्याची दैनंदिन ५००० मे. टनावरुन ७५०० मे. टनाची विस्तारवाढ करीत असताना या विस्तारवाढीची एकूण प्रकल्प किंम्मत ही ७५.६५ कोटी रुपये होती यामध्ये आपण स्वभांडवल २६.६५ कोटी रुपये उभारुन ४९ कोटी रुपयांचे कर्ज बँकामार्फत उपलब्ध केले होते. आपण केलेल्या या विस्तारवाढीमुळे हंगामात १०० दिवसांमध्ये ७६०० मे.टन सरासरीने प्रतिदिन आपण गाळप केले असून सध्या आपला कारखाना ८८०० ते ८९०० मे.टन प्रतिदिन गाळप करीत आहे. या गाळप क्षमतेने शेतकऱ्यांचा ऊस लवकरात लवकर संपविण्यासाठी आपण प्रयत्न करीत असून शेतकरी कृती समितीने यापुर्वी विस्तारवाढीस विरोध केला नसता तर आपली विस्तारवाढ यापुर्वीच झाली असती व शेतकऱ्यांचे नुकसानही झाले नसते. तसेच सध्या आपल्या कारखान्याची को-जनरेशनची विस्तारवाढ आपण करीत असून या प्रकल्पाची एकूण किंमत ही ११५ कोटी रुपये आहे. यामध्ये ८० कोटी रुपये बँक कर्ज व आपण ३५ कोटी रुपये स्वभांडवल निधी उभारुन करत आहोत. यानंतर पुढील काळात आपण डिस्टीलरीचे देखिल विस्तारीकरण करणार असून त्यासाठी देखिल आपल्याला कर्ज उभारणी आणि स्वभांडलाची आवश्यकता लागणार आहे. हे स्वभांडवल निधी जमविणेसाठी आपणास शेअर्सची रक्कम उपयोगी पडणार असून यासाठी आपण शेअर्स कपात करीत आहोत याची ही नोंद कृती समितीने घ्यावी. तसेच भविष्याचा विचार करता सर्वच कारखाने शेअर्सच्या प्रमाणात ऊस गाळपास आणण्याची शक्यता नाकारता येत नसून ऊस क्षेत्राच्या प्रमाणात आपले शेअर्स असणे योग्य राहील असे श्री. जगताप म्हणाले. कारखान्याची गाळप क्षमता वाढलेली असताना आपल्या डिस्टीलरीची कॅपॅसिटी कारखान्याच्या तुलनेने कमी पडत असलेने शेजारील माळेगांव कारखान्याप्रमाणे डिस्टीलरीची ही विस्तारवाढ करुन याचा जास्तीत जास्त फायदा आपल्या शेतकरी सभासदांना मिळेल यासाठी आपण डिस्टीलरी विस्तारवाढ भविष्यात करणार आहोत. याचा फायदा आपणास ज्यादा ऊस दर देणेस होईल.
श्री. जगताप पुढे म्हणाले की, वाढीव शेअर्सचे वाटप करीत असताना वार्षिक सभेमध्ये ठरल्याप्रमाणे मागील तीन हंगामात नोंदविलेल्या ऊस क्षेत्राच्या सरासरी प्रमाणे शेअर्स कपात आपण सभासदांकडून करणेविषयी मागणी केलेली असून ही कपात सभासदांवर जबरदस्ती नाही. कारखाना करीत असलेली शेअर्स कपात ही सभासदांच्या व संस्थेच्या हितासाठी असून कारखान्याची आर्थिक व सर्वांगीण परिस्थिती भक्कम व सक्षम आहे. त्यामुळे सभासद बांधवांच्या प्रपंच्याशी निगडीत असणाऱ्या आपल्या संस्थेबद्दल कोणताही चुकीचा गैरसमज कृती समितीने सभासदांमध्ये पसरवू नये अशी माझी त्यांना विनंती आहे.
श्री.जगताप पुढे म्हणाले की, चालु गाळप हंगामात आपल्या कारखान्याने जिल्ह्यात सर्वोच्च ११.२० टक्के साखर उतारा राखला असून सभासदांचे, कामगारांचे व तोडणी वाहतूकदारांचे पेमेंट आपण वेळेवर करीत आहोत त्यामुळे चांगल्या चाललेल्या कारखान्याच्या विकासामध्ये कृती समितीने आडकाठी आणण्याचा प्रयत्न करु नये. एकीकडे स्वार्थासाठी कारखाना सत्तेमध्ये सामील होवून दुसरीकडे चांगल्या चाललेल्या कामकाजाला विरोध करायचा म्हणजे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे ही प्रवृत्ती शेतकरी कृती समितीने बंद करावी. कारखान्याची आर्थिक पत ढासळलेलेबाबत कृती समितीला जर खरोखरच शंका असेल तर त्यांचे जे प्रतिनिधी संचालक मंडळामध्ये कार्यरत आहेत त्यांचेकडून त्यांनी व्यवस्थित योग्य ती माहिती घ्यावी व नंतरच यावर भाष्य करावे. चुकीची माहिती देवून सभासदांमध्ये विनाकारण गैरसमज पसरवू नये.
श्री. जगताप पुढे म्हणाले की, शेतकरी कृती समितीला जर सोमेश्वरच्या सभासदांविषयी एवढाच खरा कळवळा असेल तर त्यांनी सभासदांच्या मालकीचे मु.सा. काकडे कॉलेज सभासदांच्या तात्काळ ताब्यात द्यावे नाहीतर हे कॉलेज बंद पाडावे का असा इशारा आम्हीही देवू शकतो. लवकरच मु.सा. काकडे कॉलेज, त्याची इमारत व जागा हे सभासदांच्या मालकीची होण्यासाठी मा. हायकोर्टाकडून आपल्या सोमेश्वरच्या सभासदांना न्याय मिळणार आहे. याबद्दल शंका नाही आणि म्हणून की काय चांगल्या चाललेल्या संस्थेच्या कामकाजाला दृष्ट लावण्याचा केविलवाणा प्रयत्न कृती समितीचे अध्यक्ष करीत आहेत. परंतू कारखान्याच्या सभासदांचा सोमेश्वर कारखान्यावरती व कारखान्याचे मार्गदर्शक आदरणीय अजितदादा पवार यांचेवरती ठाम विश्वास असून ते संस्थेच्या हिताच्या बाजुने कायम उभे आहेत. त्यामुळे कोणीही कितीही बदनामी केली तरी आपली संस्था कायम सर्वोच्च स्थानी राहील असा मला विश्वास आहे.
श्री. जगताप म्हणाले की, आत्तापर्यंत आपल्या कारखान्याने ८.०० लाख मे. टनाचे गाळप पूर्ण केले असून उर्वरीत संपूर्ण ऊसाचे गाळप दोन महिन्यामध्ये करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे आपल्या सभासद शेतकऱ्यांनी इतर बाहेरच्या कारखान्यांना ऊस न देता आपल्याच कारखान्याला ऊस देवून सहकार्य करावे.