प्रतिनिधी
पुणे, दि.६: भारत निवडणूक आयोगाने मतदार सुविधाकेंद्रीत निवडणूकांवर भर देण्यात येत आहे. मतदानाची टक्केवारी वाढण्याच्यादृष्टीने २०५- चिंचवड विधानसभा मतदार संघात निवडणूक विषयक अधिकारी कर्मचारी घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक आदींसाठी मतदानासाठी उपलब्ध सुविधांची माहिती देत आहेत.
सर्व स्तरातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाऊन राष्ट्रीय कार्यात सहभाग घ्यावा यासाठी निवडणूक आयोगामार्फत प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गत २०५- चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीदरम्यान मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी ८० वर्षेपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांच्या तसेच दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन निवडणूक अधिकारी जागृती करत आहेत.
८० वर्षे पेक्षा जास्त वय असणाऱ्या तसेच दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक आयोगाने प्रथमच घरामधून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी अशा मतदारांकडून मतदार नोंदणी करणारे अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष अशा मतदारांच्या घरी जाऊन इच्छुकांकडून ‘नमुना १२ डी’ नमुना अर्ज भरुन घेत आहेत.
त्याशिवाय दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी व्हीलचेअर, अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीचा समावेश असलेले मतदान यंत्र (ईव्हीएम), घरापासून मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याची सुविधा आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात, आदीसंबंधाने चिंचवड विधानसभा मतदार संघात प्रबोधन करण्यात आल्याची माहिती समन्वयक अधिकारी अजय पवार यांनी दिली आहे.