• Home
  • सामाजिक
  • शिवरीच्या मनीषा कामथेंची शून्यातून सुनियोजित लघुउद्योगाकडे वाटचाल*
Image

शिवरीच्या मनीषा कामथेंची शून्यातून सुनियोजित लघुउद्योगाकडे वाटचाल*

प्रतिनिधी. विजय गायकवाड

पुणे, दि. 23: इच्छाशक्ती आणि संघर्षाच्या बळावर शून्यातून भरारी घेता येते हे शिवरी (ता. पुरंदर) येथील मनीषा संतोष कामथे यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी घरगुती डंका व्यवसायातून सुरूवात करत मसाला आणि सहउत्पादने निर्मितीच्या क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल सुरू ठेवली आहे. त्यांच्या उत्पादनांची आणि संघर्षाची दखल संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने (युएनडीपी) घेतली आहे.

दहावीपर्यंत शिकलेल्या मनीषा यांना शेती व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि तीन मुलांच्या शिक्षणासाठी खर्चाची जुळवाजुळव करणे कठीण जात होते. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी मावसबहिणीच्या सल्ल्याने २०१९ मध्ये एक लहान मसाला यंत्र (डंका) घेऊन मसाले कुटून देण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला ग्राहकांचे मसाले कुटून देण्याचे काम केले.

पुढे पती संतोष कामथे यांच्या मदतीने त्यांनी बाजारातून चांगल्या प्रकारची मसाल्याची साधनसामुग्री आणून विक्रीसाठी ठेवण्यास सुरुवात केली. जोडीला शेवई यंत्र खरेदी करुन शेवई तयार करुन देण्याचा व्यवसायही सुरू केला. स्वत:ही हे पदार्थ तयार करुन विक्रीदेखील सुरू केली. एक वेगळी आणि अस्सल चव राखल्याने ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला.

शिवरीतील ग्रामविकास स्वयंसहाय्यता समुहाने मनीषाला सासूच्या जागी सदस्य करून घेतले. २०२१ मध्ये बँक ऑफ बडोदाच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत (आरसेटी) बचत गटांसाठी आयोजित १० दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ४० प्रकारचे मसाले, लोणचे, शेवया, पापड आदी पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणातून त्यांना प्रेरणा मिळाली.

त्यांनी बँकेच्या कर्जासह पंचायत समितीकडून ४० हजार रुपये बीजभांडवल घेतले. त्यातून नवीन यंत्रे घेऊन व्यवसायाचा विस्तार केला. या माध्यमातून चार प्रकारचे लोणचे, शेवई, सांडगे, पापड, कुरडई, पापडी, बटाटा वेफर्स, खारवडे आदी पदार्थही बनवण्यास सुरुवात केली.

ऑगस्ट २०२२ मध्ये बारामती अॅग्री गटाच्या माध्यमातून मनीषा यांची ‘फार्म दीदी’ या संस्थेची ओळख झाली. मनीषा यांनी बनवलेल्या दर्जेदार उत्पादनांमुळे संस्थेने प्रशिक्षणासह संस्थेसाठी पदार्थ बनवून देण्याची संधी उपलब्ध करुन दिली. त्यानुसार लसूण लोणचे, लसूण चटणी, लिंबू मिरची लोणचे, चिली आदी पदार्थ बनविण्यास सुरूवात केली. सुरुवातीच्या ५० ते ६० किलोच्या ऑर्डरपासून आता दर पंधरा दिवसाला ८०० किलोपर्यंत ऑर्डर मिळत आहे.

याच बरोबर त्यांनी ‘महालक्ष्मी मसाले’ या नावाने मसाल्याचा स्वत:चा ब्रँड केला असून हळूहळू त्याला मागणी वाढत आहे. थेट केरळमधून खरेदी करण्यात येत असलेल्या लवंग, मिरी, दालचिनी आदी मसाला सामग्रीमुळे मसाल्यांना अस्सल सुगंध आणि चव येते, असे मनीषा सांगतात. मसाले तयार करुन घेण्यासाठी दूरवरून ग्राहक येतात. त्यांच्या मसाले तसेच इतर पदार्थांचे मार्केटिंग कोकणापर्यंत पोहोचले आहे.

त्यांचा ग्रामविकास स्वयंसहाय्यता समूह कृषी विभागाच्या ‘आत्मा’ यंत्रणेशी जोडला असल्याने बारामती येथे झालेल्या ‘कृषिक-२०२३’ प्रदर्शनात, उमेद अभियानाद्वारे पुणे विभागीय सरस विक्री प्रदर्शन ‘दख्खन जत्रा’ मध्ये स्टॉल उपलब्ध करुन दिला. यावेळी मनीषा यांच्या उत्पादनांची मोठ्या प्रमाणात विक्री व जाहिरात झाली.

मनीषा कामथे यांनी ‘फार्म दीदी’ संस्थेला पुरवलेल्या पदार्थांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या युएनडीपीकडून विशेष पुरस्कार मिळाला आहे. युनडीपीच्या प्रतिनिधींनी मनीषा यांच्या युनिटची पाहणी करीत त्यांच्या संघर्षाची यशोगाथा बनवून जगभरात प्रसारित केली. खऱ्या अर्थाने त्यांच्या संघर्षाला झळाळी मिळाली.

मनीषा कामथे, शिवरी:- आमच्या पदार्थांची मागणी वाढत असून व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मोठ्या क्षमतेच्या यंत्रसामुग्री घ्यायच्या आहेत. त्यासाठी बरीच भांडवली गुंतवणूक करावी लागणार आहे. कृषी विभागामार्फत प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत (पीएमएफएमई) १५ ते २० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य व कर्जासाठी प्रस्ताव तयार करणार आहे.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा…

ByBymnewsmarathi Jan 6, 2026

बारामती बिबट्या संदर्भातील चुकीच्या बातमीबाबत स्पष्टीकरण व जाहीर माफी.

आमच्या ‘एम न्यूज मराठी’ (M News Marathi) या न्यूज पोर्टलवर काल, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी बारामती परिसरात…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद ठेवण्याबाबत प्रशासकीय चर्चा; लवकरच होणार अंतिम निर्णय

प्रतिनिधी बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २८८.१७ कोटींचा विकास…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

गोमाता’ फक्त भाषणातच का? रस्त्यावर फेकल्या जाणाऱ्या वासरांच्या नशिबी मरणयातनाच!

सह संपादक- अक्षय थोरात ​ ​आपण गायीला ‘माता’ मानतो, तिची पूजा करतो. पण आज समाजातील एक भयाण वास्तव…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025