शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत भोर येथे २४ मे रोजी मेळाव्याचे आयोजन

माझा जिल्हा

प्रतिनिधी

अधिकाधिक नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत भोर तालुक्यातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी २४ मे रोजी सकाळी ११ वाजता गंगोत्री हॉल, भोर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यामध्ये जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले रहिवास दाखले, अधिवास प्रमापणत्र इत्यादी विविध प्रकारचे दाखले वाटप करणे, ७/१२ व फेरफार वाटप करणे, पोटखराब वर्ग-अ लागवडीखाली आणणेबाबतचे कामकाज, लागवडीखाली आणलेल्या पोटखराब क्षेत्राच्या गटांचे ७/१२ वितरण करणे, नवीन व दुबार शिधा पत्रिकाचे कामकाज, शिधा पत्रिका विभक्त करणे, शिधा पत्रिकेतून नावे कमी करणे व वाढविणे याबाबतचे कामकाज, मतदार यादीशी आधार लिंक करणे, पी. एम. किसान योजनेबाबतचे कामकाज, संजय गांधी योजनांचा लाभ देण्यात आला आहे.

या मेळाव्यापुर्वी १९ मे अखेर जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, रहिवास दाखले, अधिवास प्रमाणपत्र इत्यादी विविध प्रकारचे दाखल्यांबाबतचे अर्ज भागनिहाय नियुक्त केलेल्या महा ई-सेवा व सेतू केंद्रांमध्ये संबंधितांकडून जमा करण्यात येणार आहे. महा ई-सेवा व सेतू केंद्रांकडून प्राप्त अर्जाची छाननी करुन दाखले तयार करण्यात येणार आहे. सदरचे दाखले मेळाव्याच्या दिवशी वितरण केले जाणार आहे.

पोटखराब वर्ग-अ लागवडीखाली आणण्याबाबतचे अर्ज, नवीन व दुबार शिधा पत्रिका अर्ज, शिधा पत्रिका विभक्त करण्याबाबत अर्ज, शिधा पत्रिकेतून नावे कमी करणे व वाढविणे याबाबतचे अर्ज मतदार यादीशी आधार लिंक करणेसाठी आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून घेणे, पी.एम. किसान योजनेबाबतचे अर्ज संजय गांधी योजनेबाबतचे अर्ज सदर कालावधीत अर्जदार, लाभार्थी हे संबंधित गावचे तलाठी यांच्याकडे व तलाठी अर्जाची छाननी करुन दररोज असे अर्ज तहसिल कार्यालयातील संबंधित शाखेकडे सुपूर्द करतील.

या प्रक्रियेअंतर्गत १९ मे अखेर प्राप्त अर्जात त्रुटी असल्यास त्याची मेळाव्याच्या दिवशी पुर्तता करावी. १९ मे पर्यंत अर्ज सादर करता आले नाही अशा लाभार्थ्याचे अर्ज मेळाव्याच्या दिवशीदेखील स्विकारण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

या मेळाव्यात तालुक्यातील पंचायत समिती, कृषी विभाग, विज वितरण विभाग, वन विभाग, बांधकाम विभाग, भूमि अभिलेख विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, सहकार विभाग, पोलीस विभाग, नगरविकास विभाग, पशुसंवर्धन विभाग, पाटबंधारे विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, एसटी महामंडळ इत्यादी विविध विभागांकडील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करणेची कार्यवाही करण्यात येणार आहे.

या मेळाव्यामध्ये भोर तालुक्यातील अधिकाधिक नागरीकांनी सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे.