असे निदर्शनास आले आहे की, चारचाकी वाहन चालक व वाहनामधील इतर प्रवासी सिट बेल्टचा वापर करीत नाहीत. वाहतूक अपघातांच्या वस्तुनिष्ठ अहवालांचा अभ्यास केला असता बऱ्याच वेळा सिटबेल्ट न लावल्यामुळे मनुष्यहानी झाली असल्याची प्रकरणे आढळून आली आहेत.
इतर वाहतूक नियमांचे पालन करीत असताना सिट बेल्टच्या वापरास प्राधान्य देणे आवश्यक आहे.केंद्रीय मोटार वाहन नियम १२५ (१) अन्वये आठ प्रवासी क्षमतेपर्यंत आसन व्यवस्था असलेल्या (Front Facing) सर्व चारचाकी वाहनातील प्रवाशांना सिटबेल्ट वापरणे बंधनकारक आहे. तसेच मोटार वाहन (सुधारीत) कायदा २०१९ कलम १९४ (ब) (१) अन्वये वाहन चालक व प्रवास करणारे सर्व सह प्रवासी यांनी सिटबेल्टचा वापर न केल्यास वाहन चालकांवर ईचलान कारवाई करण्याबाबत आदेश झाले आहेत.
त्या अनुषंगाने वार्तापत्राद्वारे सर्व वाहन चालकांना दिनांक ३१/१०/२०२२ रोजी पर्यंत सिटबेल्ट बसविण्याकरीता आवाहन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने खालील प्रमाणे आदेशित करण्यात येत आहे.
१. दिनांक ०१/११/२२ रोजी पासून दिनांक १०/११/२२ रोजी पर्यंत १० दिवस नागरीकांमध्ये सिटबेल्ट वापरण्याबाबत जनजागृती करावी. जे वाहनचालक/ प्रवासी जाणीवपूर्वक सिटबेल्टचा वापर करीत नाहीत त्यांना कडक शब्दात समज देण्यात यावी. त्यानंतर दिनांक ११/११/२०२२ रोजी पासून ई चलन कारवाई सुरू करावी.
२. ज्या वाहनांमध्ये सिटबेल्टची व्यवस्था करण्यात आलेली नाही अशा वाहनावर ई चलन कारवाई करण्यात येवू नये. परंतू सदर वाहनचालकास ३० दिवसांच्या आत सिटबेल्टची व्यवस्था करून घेण्याबाबत समज दयावी.
3. या चारचाकी वाहनामध्ये (टॅक्सी/खाजगी) मागील बाजूस मधील आसनाकरीता कंपनीमार्फतसिटबेल्टची व्यवस्था करण्यात आलेली नाही, अशा वाहनातील मधील आसनावरील प्रवाशांवर ई चलन कारवाईकरण्यात येवू नये.
४. ज्या प्रवासी टॅक्सीमध्ये कंपनीमार्फत मागील प्रवाशांकरिता सिटबेल्टची व्यवस्था करण्यात आलेली नाही, अशा टॅक्सीवर कारवाई करण्यात येवू नये.
५. ज्या प्रवासी टॅक्सीमध्ये सिटबेल्टची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतू प्रवासी त्याचा वापर करीत नाहीत, अशावेळी चालकावर कारवाई न करता प्रवाशांवर ई चलन कारवाई करावी. कारवाई दरम्यान प्रवाशांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक मशिनमध्ये नमुद करावे. कारवाई दरम्यान तडजोड शुल्काची रक्कम संबंधित प्रवाशाकडून शक्यतो जागेवरच वसुल करावी.