प्रतिनिधी
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने ‘कौशल्य केंद्र आपल्या दारी’ या संकल्पनेतून पुणे विभागातील नामांकित उद्योग, उद्योग संघटना, प्लेसमेंट एजन्सीज व मोठे लेबर कंत्राटदार यांच्यासोबत सामंजस्य करार करण्याकरिता ९ जून रोजी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे उद्योग बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी ह. श्री. नलावडे यांनी दिली आहे.
राज्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. त्यापैकी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ हे अधिक प्रभावी माध्यम आहे. या रोजगार मेळाव्यात उद्योजक व नोकरी इच्छूक उमेदवार यांना एका व्यासपीठावर आणून उद्योजकांकडील रिक्तपदांसाठी मुलाखती आयोजित करुन तात्काळ नोकरीच्या संधी उपलब्ध करुन उद्योजकांना आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होते.
मागील वर्षी सामंजस्य करारनामात सहभागी झालेले उद्योजक, उत्पादन, माध्यमे आणि मनोरंजन, ऑटोमोबाईल, अन्न, गृह उपकरणे, सुरक्षा, किरकोळ, विमा, रिअल इस्टेट, फायर सेफ्टी, बीपीओ, केपीओ, कॅश मॅनेजमेंट, कॉर्पोरेट प्लेसमेंट, स्टाफिंग कंपनी, स्टाफिंग सेवा व प्लेसमेंट एजन्सी इत्यादी विविध क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देत आहेत.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, विभागाच्यावतीने मागील वर्षात साधारणता २०० मेळावे आयोजन करण्यात आले. सन २०२२-२३ पासून ६०० रोजगार मेळावे आयोजित करण्याचे उद्दिष्ट आहे. मेळाव्याचे आयोजन प्रभावीरीत्या होण्यासाठी शासनातर्फे भरीव तरतूद करण्यात आली आहे. सन २०२२-२३ अखेर पर्यंत आयुक्तालयामार्फत विविध योजना व ५५७ रोजगार मेळाव्याद्वारे सुमारे २ लाख ८३ हजार उमेदवारांची नोकरीसाठी निवड झालेली आहे.
महाराष्ट्रातील बेरोजगार तरूणांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी पुणे विभागातील सर्व नामांकित उद्योजक, इंडस्ट्री असोसिएशन, प्लेसमेंट एजन्सीज व मोठे लेबर कंत्राटदार यांनी रोजगार मेळाव्यात त्यांच्याकडील रिक्तपदे उपलब्ध करून द्यावी व बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने केले आहे.
अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ पुणे येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्र. ०२०-२६१३३६०६ यावर संपर्क साधावा.