प्रतिनिधी
‘बार्टी’मध्ये वेगवेगळे प्रशिक्षणे देण्यासाठी संस्था निवडीबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संस्था निवड करण्यात येते. मात्र, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असले, तरी विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही, यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल. विविध महाविद्यालयांशी संपर्क साधला असून या महविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सहमती दर्शवली आहे, असे उत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानरिषदेत दिले.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे, अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याबाबत शासनाची कोणती भूमिका आहे याबाबत सदस्य विजय उर्फ भाई गिरकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. देसाई बोलत होते.
मंत्री श्री. देसाई म्हणाले की, विद्यार्थी हीत, संस्था निवडप्रक्रियेत पारदर्शकता व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण राबविण्याकरिता वित्त विभागाची वित्तीय नियमावली व उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या १ डिसेंबर २०१६ रोजीच्या खरेदी धोरणानुसार व केंद्रीय दक्षता आयोगाच्या मागदर्शक तत्वानुसार संस्था निवडीकरीता ई-निविदा प्रक्रिया शासनाचे धोरण आहे. सद्य:स्थितीत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणेमार्फत बँक (आयबीपीएस), रेल्वे, आयसी इत्यादी तत्सम स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण आणि पोलीस व मिलिटरी भरतीपूर्व प्रशिक्षण राबविण्याबाबत सामाजिक न्याय विभागाच्या दि.२८ ऑक्टो २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये कार्यक्रम निश्चित केला आहे. यामध्ये ५ वर्षांमध्ये साधारणतः १०,००० विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समावेश आहे. याबाबत ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. सद्य:स्थितीत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तरीही या विषासंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल, विद्यार्थांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही यासाठी विविध महाविद्यालयांशी संपर्क साधला असून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच ‘सारथी’, ‘महाज्योत्ती’ आणि ‘बार्टी’ यांच्या कार्यपद्धतीमध्ये समानता आणणारे धोरण लवकरच शासन आणणार आहे, याची योग्य ती खबरदारी घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री विक्रम काळे, सतेज पाटील, अमोल मिटकरी, प्रवीण दटके, कपिल पाटील, डॉ. मनीषा कायंदे, अभिजित वंजारी, महादेव जानकर यांनी सहभाग घेतला