प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यात ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीत ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम राबविण्यात येणार असून त्याचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पंचप्रण शपथ घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.
‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमांतर्गत शिलाफलकम, वसुधा वंदन, स्वातंत्र्य सैनिक वीरांना वंदन, पंच प्रण शपथ, ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. वसुधावंदन उपक्रमासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ७५ वृक्षांची लागवड करून अमृत वाटीका तयार करण्यात यावी. अमृत सरोवर, पाणी साठ्याचे ठिकाण, ग्रामपंचायत किंवा शाळेच्या परिसरात अमृत वाटीका तयार करण्यात यावी. वृक्ष लागवड महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात यावी.
शालेय प्रांगणात मातृभूमीची सुरक्षा आणि तीच्या गौरवाच्या रक्षणाकरिता वीरांनी दिलेल्या बलिदानाची माहिती जनतेला मिळावी यासाठी शिलाफलकम तयार करण्यात यावा. शीलाफलकावर वीरांची नावे देण्यात यावी. ग्रामसभेत जनजागृती करून या उपक्रमाची माहिती देण्यात यावी. देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान केलेल्या स्थानिक सराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रातील लष्कर किंवा पोलीस दलातील निवृत्त अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक यांच्या परिवारातील सदस्यांचा सन्मान करण्यात यावा.
पंचप्रण शपथ घेण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून तयार केलेल्या मातीच्या दिव्यांची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. असे दिवे बचतगटांच्या माध्यमातून शिधावाटप दुकानात उपलब्ध करून देण्यात यावेत. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येवून प्रत्येक घरी राष्ट्रध्वज फडकविण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात यावे. यादरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील एक मूठ माती समन्वयक अधिकाऱ्याकडे सोपविण्यात यावी, अशा सूचनाही जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.
*पंचप्रण शपथ*
‘आम्ही शपथ घेतो की, भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करु. गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करु. देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करु. भारताची एकात्मता बलशाली करु आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरीक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करु.’
अभियानात सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी https://merimaatimeradesh.gov.in/ हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर शपथ घेतांना मातीचा दिवा किंवा माती हाती धरून काढलेले सेल्फी अपलोड करता येतील.