प्रतिनिधी
उद्योगी, होतकरू युवकांच्या कल्पनाशक्तीला आर्थिक बळ मिळाल्यास ते शून्यातून मोठी प्रगती गाठू शकतात. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची साथ मिळालेल्या बारामती येथील बिभीषण भापकर यांनी हे दाखवून दिले आहे. त्यांचा प्रवास मराठा समाजातील युवकांसाठी प्रेरणादायी असाच आहे.
बिभीषण भापकर यांचे शिक्षण वाणिज्य शाखेत बारामती येथून झाले. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय शेती हा आहे. शेतीवर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य होत असल्यामुळे त्यांनी दरमहा सहा हजार रुपयांवर एका कंपनीत काम स्विकारले. अपूर्ण उत्पन्न आणि आवडीचे क्षेत्रही नसल्याने ते नोकरीत रमले नाही.
आपला व्यवसाय असावा आणि त्यात परिश्रमाच्या बळावर पुढे जावे अशी त्यांची इच्छा होती. अशातच वर्तमानपत्रामध्ये प्लास्टिक बंदीची बातमी वाचली व पेपर पासून कप बनविण्याची कल्पना सुचली. त्याला साथ मिळाली अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची. त्यांनी पेपरपासून कप तयार करुन आज सुमारे ६० हजारापर्यंत मासिक उत्पन्नापर्यंत मजल मारली आहे.
कोणताही व्यवसाय करायचाय तर भांडवल पाहिजे. भापकर यांना जवळच्या मित्राकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकासमहामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेविषयी माहिती मिळाली. पुणे येथील महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातून योजनेची संपूर्ण माहिती घेतली. त्यानुसार कर्जासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची जुळवाजुवळ करुन इंडियन बँकेकडे प्रस्ताव सादर केला.
बँकेडून ९ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले. भोसरी येथे औद्यागिक वसाहतीमध्ये भाडे तत्वावर जागा घेऊन एका यंत्राद्वारे व्यवसाय सुरु केला. व्यवसाय सुरु केल्यानंतर चारच महिन्यांनी कोरोना विषाणूमुळे सर्वत्र लॉकडाऊन लागून परिणामी व्यवसाय बंद पडला. कोरोना कालावधीचे एक वर्ष निघून गेले. घरच्या आग्रहामुळे बारामती येथे पेपरपासून कप बनविण्याचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेतून १ लाख ९० हजार रुपयांचा परतावा मिळाला. व्याज परताव्याची रक्कम व्यवसायात गुंतवली; व्यवसायामध्ये वाढ झाली. आणखी एका यंत्राची भर पडून यंत्रांची संख्या दोनवर गेली. वाहतुकीसाठी एक टेम्पोही घेतला. उलाढाल तीस लाख रुपयांपर्यंत वाढली असून सर्व खर्च वगळता मासिक ६० हजार रुपये नफा होत आहे.
राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या व तशी क्षमता असलेल्या तरुण वर्गाला आर्थिक सहाय्य पुरविण्याच्या दृष्टीने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना या दोन योजना राबविण्यात येत आहेत. महामंडळाच्यावतीने एक लाख उद्योजक करण्याचा संकल्प केला असून त्यादृष्टीने भापकर सारखे हजारो उद्योजक घडत आहेत.
योजनेची माहिती https://udyog.mahaswayam.gov.in/#/home संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ज़िल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, केईएम रुग्णालयाजवळ, मुदलियार रोड, रास्ता पेठ, पुणे (दु.क्र. ०२०-२६१३३६०६) येथे संपर्क साधावा.
*बिभीषण भापकर, बारामती:* माझे उद्योजक बनण्याचे व व्यवसाय करण्याचे स्वप्न अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सहकार्याने पूर्ण झाले. महामंडळाच्या व्याज परतावा योजनेचा लाभ मिळाल्यामुळे माझ्या व्यवसायाला उभारी मिळाली असून माझे कुटुंब सुखी जीवन जगत आहे.