अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

माझा जिल्हा

प्रतिनिधी

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षापासून पुणे जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत असून पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत आपले स्वाधार अर्ज https://swadhar.acswpune.com या संकेतस्थळावर ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने भरून आपल्या महाविद्यालयाकडे जमा करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत इयत्ता १० वी नंतरच्या इयत्ता ११ वी व १२ वी आदी अभ्यासक्रमांना तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या

मात्र शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सन २०१६-१७ पासून

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू केली आहे.

पुणे जिल्ह्यातील, पुणे महानगरपालिका तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या सर्व महाविद्यालयांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घ्यावेत.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पुणे यांच्या कार्यालयात सादर करावेत. अर्जाचा नमुना तसेच अर्ज सादर करावयाची नियमावली स्वतंत्रपणे पाठविण्यात येईल.

महाविद्यालयात प्रवेशित एकही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी स्वाधार योजनेपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पुणे विशाल लोंढे यांनी केले आहे.