जळगाव सुप्यात ड्रोनद्वारे औषधे फवारणीचे प्रात्यक्षिक

माझा जिल्हा

प्रतिनिधी

जळगाव सुपे (ता. बारामती) येथे बारामती ॲग्रोस्टार शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने ड्रोनद्वारे औषधे फवारणीचे प्रात्यक्षिके घेण्यात आली. तसेच यावेळी करडई व कांदा या पिकाविषयी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

शेतकरी दिगंबर जगताप यांच्या एक एकर करडईच्या व आनंदाराव खोमणे यांच्या कांदा या एक एकर पिकावर ड्रोनद्वारे औषधांची फवारणी करण्यात आली. ही औषधांची फवारणी अर्ध्यातासात पूर्ण झाली. यावेळी शेतकरी व अधिकारी यांची करडई, ज्वारी व कांदा या पिकाची पाहणी करण्यासाठी शिवारफेरी काढण्यात आली होती.

डॉ. सुरेश गवांडे यांनी कांदा या पिकावर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच करडई या पिकाबाबत तालुका कृषी सुप्रिया बांदल यांनी मशागत, लागवड , कीड रोग नियंत्रण व काढणी आदींसह सविस्तर माहिती दिली.

यावेळी तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ डॉ. विवेक भोईटे, राजगुरुनगर येथील कांदा संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ सुरेश गावंडे, कृषी मंडल अधिकारी चंद्रकांत मासाळ, कृषी सहाय्यक संध्या लव्हे, ॲग्रोस्टार शेतकरी कंपनीचे अध्यक्ष सुनील जगताप, संचालक अनिल वाघ तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल वाघ व आभार सुनील जगताप यांनी मानले.