विद्यार्थिनीसोबत गैरप्रकार झाल्याचे शाळेतील समुपदेशनात उघड, आरोपी शिक्षक अटकेत

क्राईम

प्रतिनिधी

विद्यार्थिनीचा शिक्षकाने विनयभंग केल्याचे शाळेतील समुपदेशनादरम्यान उघडकीस आले असून अखेर याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून गावदेवी पोलीस ठाण्यात विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली.

पीडित मुलगी १४ वर्षांची असून गावदेवी परिसरातील शाळेत शिक्षण घेत आहे. नुकतीच त्यांच्या शाळेत विद्यार्थ्यांचे समुपदेशन सुरू होते. त्यावेळी ती रडायला लागली. तिला समुपदेशन करणाऱ्यांनी विश्वासात घेतले असता तिने तिच्यासोबत झालेल्या गैरप्रकाराची माहिती त्यांना दिली. आरोपीने जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यात पीडित मुलीचा सतत पाठलाग केला. तसेच तिचा विनयभंगही केला. या प्रकरणामुळे ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती. पण भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. अखेर समुपदेशनादरम्यान मुलीने हा प्रकार संबंधितांना सांगितला. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिसांनी तत्काळ मुलीची तक्रार नोंदवून घेतली आणि आरोपी शिक्षकाविरोधात विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आरोपी शिक्षकाला मंगळवारी रात्री अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.