१५ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी खेड तालुक्यातील काळुस येथील शेतकऱ्यांवर त्यांच्या शेतजमिनीवरील बेकायदा पुनर्वसन हटवण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण करण्याची वेळ”-

Uncategorized

 प्रतिनिधी.
कुठल्याही परिस्थितीत पुनर्वसनचे शिक्के काढुन सातबारा कोरा करण्याचा निर्णय झाल्याशिवाय आमरण उपोषण सोडणार नाही असा उपोषणकर्त्यांचा निर्धार आहे.!
खेड तालुक्यातील चासकमान धरण अंतर्गत काळुस या गावातील शेतकऱ्याच्या जमिनीवर चाळीस वर्षांपासून पुनर्वसनाचे शिक्के टाकण्यात आले आहेत. ते अद्याप कायम आहेत. येथील बाधित शेतकरी गेली ४0 वर्षे वेगवेगळ्या मार्गाने पुनर्वसन शिक्के काढण्यासंदर्भात संघर्ष करीत आहेत. रास्ता रोको, मुंबई येथे आझाद मैदानावर सलग ३१ दिवस उपोषण, पदयात्रा, व न्यायालयीन प्रक्रिया, अशा वेगवेगळ्या मार्गाने लढा देत आहेत परंतु तरीही चाळीस वर्षे लढा देऊनही शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. म्हणून १५ ऑगस्ट २०२४ भारतीय स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय पुनर्वसन बाधित शेतकऱ्यांनी केला आहे.
जोपर्यंत पुनर्वसनाचे शिक्के काढले जात नाही व सातबारा कोरा केला जात नाही . तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्ते शेतकऱ्यांनी केला आहे. शासनाने वेळीच दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार देखील येथील शेतकऱ्यांनी केला आहे.
काळुस गावातील पुनर्वसन बाधित शेतकऱ्यांच्या मते आम्हाला चासकमान धरणाचे पाणी मिळणार यासाठी पुनर्वसन टाकण्यात आले होते परंतु अद्याप पाणी मिळाले नाही त्यामुळे आम्ही लाभ क्षेत्रात येत नाही आणि लाभ क्षेत्रात येत नसल्यामुळे आमच्या जमिनीवरील शिक्के काढले गेले पाहिजेत अशी त्यांची भूमिका आहे.
या परिसरातील जमिनीचे वाढते दर विचारात घेऊन पुनर्वसनाच्या नावाखाली जमिनी लाटण्याचा प्रकार सुरू असून भूमाफियांचा सुळसुळाट या भागातील जमिनी खरेदीसाठी झालेला आहे. जबरदस्तीने बेकायदेशीरपणे जमिनी खरेदी करून ताबे घेण्याचा प्रयत्न वारंवार होत आहे. त्यांना प्रशासनाची व वेगवेगळ्या राजकीय मंडळींची मदत होत आहे परंतु शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे आतापर्यंत शेतकऱ्यांनी संघर्ष करून ताबे अडवलेले आहेत . आज पर्यंत संपादित जमिनीचे बेकायदेशीरपणे शासकीय निकष डावलून जमिनीचे केलेले वाटप व झालेली खरेदी खते यांची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि अशी खरेदी खते रद्द झाली पाहिजे. अशी ही मागणी शेतकऱ्यांची आहे.
स्वातंत्र्यदिनी जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांना आमरण उपोषणा सारखा पवित्रा घ्यावा लागणे ही एक दुर्दैव म्हणावं लागेल. प्रशासनाने या आंदोलनाची वेळीच दखल घेतली पाहिजे. आजच्या उपोषणाच्या पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने शेतकरी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपोषण स्थळी उपस्थित होते.
आता शिक्के काढल्याशिवाय व सातबारा कोरा केल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत थांबायचे नाही असा निर्धारच येथील शेतकऱ्यांनी केला आहे.
बेमुदत आमरण उपोषणामध्ये रयत क्रांती शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष पवळे, सूर्यकांत काळभोर, मिनीनाथ साळुंके, भरत आरगडे, विश्वनाथ पोटवडे, विठ्ठलशेठ आरगडे,संतोष खलाटे, नवनाथ जाधव , रमेश साळुंखे प्रकाश पवळे, हिरामण पोटवडे ,मोहनराव पवळे, सुलाबाई पवळे, सुशीला पवळे यासह अनेक ग्रामस्थ व काळुस ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते