पुणे- पोलिस असल्याचे सांगून लुटमार करणाऱ्या भामट्यांना शिवाजीनगर पोलिसांनी दोन तासात बेड्या ठोकल्या. आरोपीकडून चार मोबाइल, मोबाइल असा ६५ हजारांचा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना १८ डिसेंबरला रात्री एकच्या सुमारास घडली होती. श्रीकांत भरत कदम (वय ३२, रा. पांडवनगर, पुणे) आणि सुरज राजु धोत्रे (वय ३२ रा. जुनी वडारवाडी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रक्षाराम बचराज वर्मा यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे यांचे पथक जबरी चोरीच्या पार्श्वभूमीवर आरोपींचा शोध घेत होते. गुन्ह्यातील आरोपी वडारवाडी परिसरात थांबल्याची माहिती सहायक पोलिस फौजदार अविनाश भिवरे यांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेऊन तपास केला असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम गोड, सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, उपनिरीक्षक अर्जुन नाईकवाडे, अविनाश भिवरे, गणपत वाळकोळी, बशीर सय्यद, रणजित फडतरे, सुरेंद्र साबळे, सतीश खुरंगे, आदेश चलवादी यांच्या पथकाने ही कारवाई केली.