बारामती ! अल्फिया तांबोळी निघाली उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला ; श्री. शरदचंद्रजी पवार यांचा उच्च शिक्षणासाठी अल्फीयाला आर्थिक मदतीचा हात.

Uncategorized

 -बारामती तालुक्यातील माळेगाव “बु” हे अल्फियाचे वडील जावेदभाई यांचे गाव. वडील रोजंदारी करणारे तसेच आई सौ. रेश्मा ब्यूटी पार्लर व शिवणकाम करणारी गृहिणी. अल्फियाला दोन भावंडे – एक भाऊ व एक बहीण. अतिशय तीव्र बुद्धीची असलेली अल्फियाने आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन आपल्या शिक्षणावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले.अल्फिया दहावीत असताना तिला ९७% टक्के गुण मिळाले होते. त्यावेळेस तिच्या शिक्षणाची चुणूक दिसून आली होती. त्या वेळी तांबोळी जमात बारामती यांच्या वतीने शरद सभागृह, कसबा बारामती येथे तिचा सत्कार करण्यात आला होता. पुढे OBC साठी आवश्यक दाखले काढण्यात तांबोळी जमात अध्यक्ष मुनिर तांबोळी यांनी महत्त्वाची मदत केली.तिने पुढील शिक्षण शारदानगर येथे पूर्ण केले. कायमच प्रथम येणारी अल्फिया आपल्या आईचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून, स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने शिक्षण घेत राहिली. विशेषतः, आपल्या आईसाठी तीने प्रत्येक टप्प्यावर संघर्ष केला आणि तिच्या प्रगतीचे श्रेय देखील आईला देते.अल्फियाने कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा सायन्स (Artificial Intelligence and Data Science) या शाखेतून आपले स्नातक शिक्षण 9.34 CGPA (१० पैकी) या उच्च गुणांसह पूर्ण केले.आता तिला अमेरिकेतील University of Missouri, Columbia या नामांकित विद्यापीठात “MS in Data Science and Analytics” या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. तिच्या शिक्षणासाठी अंदाजे ४५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. काल तांबोळी जमात पदाधिकाऱ्यांनी तिचा सत्कार केला, त्यावेळी तिने ही माहिती दिली.तिला पहिल्या सत्रासाठी श्री. शरदचंद्र पवारसाहेब यांच्या ट्रस्टकडून १० लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. स्वतः शरद पवार साहेबांची भेट घेऊन ही मदत मिळवली आहे.तिच्या पुढील शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या खर्चासाठी तिने शिक्षण कर्जाचे (Loan) मंजुरी केले आहे. ती आत्मविश्वासाने सांगते की, या शिक्षणातून ती भारताचे, महाराष्ट्राचे आणि बारामतीचे नाव जागतिक स्तरावर पोहोचवेल.तिच्या या प्रवासात तिला सदैव योग्य दिशा दाखवणारे, मार्गदर्शन करणारे तिचे दोन मामा – श्री. जावेद शहाबुद्दीन तांबोळी आणि श्री. सलीम शहाबुद्दीन तांबोळी – हे तिचे सर्वात मोठे आधारस्तंभ राहिले आहेत.काल अंजुमन इत्तेहाद तंबोलीयान जमात बारामती अध्यक्ष मुनिर तांबोळी व पदाधिकारी तसेच तांबोळी समाज बांधव यांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.सत्काराच्या निमित्ताने अल्फियाशी सविस्तर बोलण्याचा योग आला. तिच्या बोलण्यात तिची महत्त्वाकांक्षा, गगनभरारीचे स्वप्न व भारताला पुढे नेण्याची जिद्द जाणवत होती.अल्फिया तांबोळी ही अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेली तरुणी आहे. ती पुढील पिढीसाठी एक आदर्श व प्रेरणास्रोत ठरेल, यात शंका नाही.सत्काराच्या वेळी तिच्या आई सौ. रेश्मा, वडील जावेदभाई (आम्मी-आब्बा) तसेच आजोबा यासिनसर यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी अंजुमन इत्तेहाद तंबोलीयान बारामती जमातचे अध्यक्ष मुनिर तांबोळी, तसेच सन्माननीय पदाधिकारी जावेदभाई तांबोळी, बशीरभाई तांबोळी, अफजलभाई तांबोळी, सन्माननीय सदस्य हसनभाई (पिटूशेठ) तांबोळी, शब्बीरभाई तांबोळी, युनूसभाई तांबोळी, अरबाजभाई तांबोळी, बिलालभाई तांबोळी इत्यादी उपस्थित होते.आम्हा सर्वांना बारामतीकर नागरिक म्हणून तसेच तांबोळी समाजातील घटक म्हणून तिचा सार्थ अभिमान आहे व राहील. ती पुढील पिढीसाठी आदर्श आणि प्रेरणासुद्धा ठरेल