प्रतिनिधी.
पिंपरे खुर्द ता. पुरंदर, जि. पुणे – श्री बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय, पिंपरे खुर्द येथे कारगिल विजय दिवस राष्ट्रभक्तीच्या उत्स्फूर्त वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाचा संदेशही देण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन “मेरा युवा भारत, पुणे” व “श्री दत्तकृपा तरुण मंडळ, होळ (ता. बारामती)” यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. दिनांक 26 जुलै 2025 रोजी सकाळी 8:30 वाजता कार्यक्रमास प्रारंभ झाला.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ते कारगिल युद्धातील निवृत्त हवालदार श्री बाळकृष्ण शिवराम रासकर यांनी विद्यार्थ्यांना युद्धातील अनुभव कथन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रसेवा व शौर्याची प्रेरणा जागृत झाली.
कार्यक्रमात संजू केक शॉपचे मालक श्री संजय दनाने, श्री विशाल शिंदे व श्री धीरज वायाळ यांनी आपली उपस्थिती दर्शवली. यानंतर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, ज्यामध्ये प्रमुख पाहुणे, शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक श्री कैलास भैरू नेवसे यांनी केली. सूत्रसंचालन सौ. पूजा पराग काटकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री विकास पवार शिक्षक यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री सतीश भैय्या काकडे देशमुख, उपाध्यक्षा सौ. सुप्रिया ताई पाटील व मानद सचिव श्री मदनराव काकडे यांनी अभिनंदन व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणाऱ्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले.