मु. सा. काकडे महाविद्यालयात ‘सैनिकी जीवनातील अनुभव’ कार्यक्रमाचे आयोजन – आजी-माजी सैनिकांचा सम्मान

Uncategorized

प्रतिनिधी.

सोमेश्वरनगर :
79 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग तसेच संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सैनिकी जीवनातील अनुभव’ या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आजी-माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना श्री. अनिल शिंदे यांनी सांगितले की, “आज युद्धाचे स्वरूप झपाट्याने बदलत असून ते जैविक, आर्थिक, सायबर आणि तंत्रज्ञानाधिष्ठित झाले आहे.” त्यांनी उरी येथील सर्जिकल स्ट्राईकविषयी अनुभव कथन करताना लष्करी जीवनातील कठीण प्रसंग उलगडले.

श्री. महेश पाठक यांनी कारगिल युद्धातील प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांपुढे मांडले. त्यांनी नियंत्रणरेषेवरील परिस्थिती, सियाचिन ग्लेशियरमधील कठोर हवामान, ऑक्सिजनची कमतरता आणि युद्धासाठी आवश्यक असणारे अचूक नियोजन याबाबत सांगताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनियोजनाचे उदाहरण दिले.

श्री. बालाजी कदम यांनी आसाममधील केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना मिळालेले सेना मेडल आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार याविषयीचा अनुभव कथन केला. तर श्री. विजयकुमार गोलांडे यांनी नागा बटालियनमधील सेवा कालखंडाचे अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर केले.

यावेळी लष्करातून सेवानिवृत्त झालेले श्री. बालाजी कदम, श्री. अनिल शिंदे, श्री. प्रशांत शेंडकर, श्री. महेश पाठक, श्री. अभिनंदन फरांदे, श्री. सचिन कदम यांनी लष्करी भरती प्रक्रिया व लष्करी जीवनातील अनुभव विद्यार्थ्यांशी थोडक्यात कथन केला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी भूषवले. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “भारताच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सैनिक अहोरात्र जागरण करून पहारा देतात. विद्यार्थ्यांनीही सैनिकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशसेवेसाठी पुढे यावे.”

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सचिव तथा कार्यालय अधीक्षक श्री. सतीश लकडे, प्रा. डॉ. आदिनाथ लोंढे, प्रा. डॉ. जया कदम, प्रा. डॉ. नारायण राजूरवार, प्रा. डॉ. बाळासाहेब मरगजे, कॅप्टन प्रा. डॉ. श्रीकांत घाडगे, प्रा. डॉ. कल्याणी जगताप, प्रा. डॉ. संजू जाधव यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. आदिनाथ लोंढे यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. बाळासाहेब मरगजे यांनी मानले.