बारामती ! होळ,सदोबाचीवाडी,सस्तेवाडी, करंजेपुल गावात उभारणार स्वयंचलित हवामान केंद्र ; एआय प्रणालीद्वारे समजणार हवामानाचा अंदाज.

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

शेतकऱ्यांना हवामान बदलाची अचूक माहिती मिळण्यासाठी महसूलस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. कृषी खात्याकडून गावोगावी जागेची पाहणी करण्यात येत आहे. त्यासाठी कृषी विभागाने जागेची पाहणी सुरू केली आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत केंद्र उभे राहणार आहे.

दुष्काळ, चक्रीवादळ, अतिवृष्टी, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीत स्वयंचलित हवामान केंद्र फायदेशीर ठरणार आहे. आपत्तीचा अंदाज वर्तविल्याने जीवित व वित्तहानी कमी होण्यास मदत होणार आहे. पर्जन्यमान, तापमान, वारा वेग, थंडी,आर्द्रता, वादळे आदींची पूर्वसूचना मिळणार असल्याने शेतीचे नुकसान थाबविण्यासाठी मदत होणार आहे. स्थानिक पातळीवरील हवामान अंदाज शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरणार आहेत.

पाण्याच्या उपलब्धतेमुळे कोणते पीक कधी घ्यायचे आणि पिकाची काढणी कधी करायची हे समजू शकणार आहे. एआय आधारित प्रणाली शेतकऱ्यांना पिकाचे आरोग्य, मातीची स्थिती, पाण्याची उपलब्धता आणि संभाव्य रोग, कीटकांच्या प्रादुर्भावाबाबत वेळोवेळी सल्ला देऊ शकते. त्यामुळे स्थानिक हवामान डेटाचा संग्रह, एआयद्वारे त्याचे विश्लेषण सरकारी धोरणासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

कृषी खात्याकडून गावोगावी जाऊन जागेची पाहणी केली जात आहे. ग्रामपंचायतींच्या अर्धा किंवा एक गुंठा जागेची गरज आहे. त्यांच्याकडे जागा उपलब्ध नसल्यास भाडेतत्त्वावर घेता येते. होळ,सदोबाचीवाडी, सस्तेवाडी , करंजेपूल ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिल्याने त्या जागेवर स्वयचंलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे, असे सहायक कृषी अधिकारी मिथुन बोराटे यांनी सांगितले.