प्रतिनिधी –
सातारा–लोणंद–शिरवळ या महत्त्वाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू होत असून या कामादरम्यान रस्त्यालगत असलेल्या झाडांची तोड न करता त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आली आहे.
रस्त्यालगत असलेली व अडथळा निर्माण करणारी झाडे अत्याधुनिक यंत्रांच्या साहाय्याने मुळासकट उपटून सातारा जिल्ह्यातील वनविभागाच्या जागेत पुनर्वसन करण्यात यावे. त्यामुळे वृक्षांना जीवनदान मिळेल तसेच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, असे निवेदनात म्हटले आहे.
हे निवेदन संभाजी ब्रिगेडचे सातारा जिल्हाध्यक्ष रफीक शेख, खंडाळा तालुका उपाध्यक्ष दिपक बाटे आणि लोणंद शहराध्यक्ष रोहित कोळेकर यांनी जिल्हाधिकारी सचिन पाटील यांना दिले.
पर्यावरण संरक्षण आणि विकासकामे या दोन्हींचा समतोल राखतच रस्ता रुंदीकरण व्हावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.