प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याने पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्याचे नेतृत्व अनुभवी, संघटनकौशल्य असलेल्या नेत्याकडे सोपविण्यात आल्याने पक्षसंघटना आगामी काळात अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
संभाजी होळकर यांनी मागील काही वर्षे बारामती तालुका अध्यक्ष म्हणून प्रभावीपणे काम पाहिले आहे. या कालावधीत त्यांनी संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणे, युवक व महिलांना पक्षाशी जोडणे तसेच पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. त्यांच्या नेतृत्वाखाली बारामती तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक रचना अधिक सक्षम झाली असून अनेक स्थानिक प्रश्नांवर त्यांनी ठाम व प्रभावी भूमिका बजावली आहे.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संभाजी होळकर यांची नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ग्रामीण व शहरी भागातील समन्वय साधत संघटनात्मक बांधणी करण्याची त्यांची पद्धत निवडणुकांमध्ये पक्षासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पक्षाची ताकद वाढविण्यासाठी ते सक्रियपणे काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, संभाजी होळकर यांच्या नियोजनकौशल्याचा प्रत्यय नुकताच बारामती येथे आला. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पत्रकार दिनाच्या दिवशी सर्व संघटनांचे पत्रकार एकाच छताखाली एकत्र आल्याचे कधीही पाहायला मिळाले नव्हते. मात्र संभाजी होळकर यांच्या पुढाकारातून व सूचक नियोजनातून काल बारामती येथे पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना एका छताखाली एकत्र आणण्यात आले. यावेळी विविध माध्यमांतील व विविध संघटनांतील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमामुळे पत्रकारांमध्ये एकोपा, सन्मान आणि आपुलकीची भावना निर्माण झाली असून पत्रकारिता क्षेत्रात सकारात्मक संदेश गेला आहे.
संभाजी होळकर यांच्या नियुक्तीबद्दल पुणे जिल्ह्यातील जिल्हा, तालुका व शहर पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्ह्यात अधिक मजबूत होईल आणि जनतेच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे लढा देईल, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

















