मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 15 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 13 June 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
June 13, 2026 1 मिनिट वाचन 8,522 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हडपसर, फुरसुंगी आणि भेकराईनगर परिसरात सुरू असलेल्या बेकायदा कॉल सेंटरवर छापेमारी करून पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे.

सायबर विभाग, हडपसर पोलीस आणि मुंढवा पोलीस यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे संतोष दत्ता वेंजनेकर आणि विनायक उर्फ दीपक मनोहर इक्के अशी आहेत.

प्राथमिक तपासात आरोपी ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नागरिकांना कमी वेळेत अधिक पैसा कमावण्याचे आमिष दाखवत असल्याचे समोर आले आहे. यासाठी कॉल सेंटरमधील कर्मचारी विविध राज्यांतील लोकांशी संपर्क साधून त्यांना गेममध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत होते.

फसवणुकीची पद्धत अत्यंत नियोजनबद्ध होती. सुरुवातीला खेळाडूंना जाणीवपूर्वक काही रक्कम जिंकून देण्यात येत असे, त्यामुळे त्यांचा विश्वास संपादन केला जात होता. त्यानंतर अधिक नफ्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून घेतली जात होती. गेममध्ये नुकसान झाल्यानंतर ते भरून काढण्यासाठी आणखी पैसे गुंतविण्याचा दबाव टाकला जात होता. या प्रक्रियेत अनेक नागरिकांनी लाखो रुपये गमावल्याचे उघड झाले आहे.

तपासादरम्यान संतोष वेंजनेकर याने स्वतःच्या कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे व इतर कागदपत्रांचा गैरवापर करून अनेक बनावट बँक खाती उघडल्याचेही समोर आले आहे. या खात्यांचा वापर फसवणुकीतून मिळालेली रक्कम विविध मार्गांनी वळविण्यासाठी आणि पैशांचा मूळ स्रोत लपविण्यासाठी केला जात होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, या रॅकेटद्वारे दररोज सुमारे ३०० ते ४०० नागरिकांना लक्ष्य केले जात होते आणि त्यातून लाखो रुपयांची बेकायदेशीर कमाई केली जात होती. छापेमारीदरम्यान पोलिसांनी संगणक, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.

या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार दुबईमध्ये बसून कारभार चालवत असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू असून या रॅकेटशी संबंधित इतर आरोपींचीही माहिती गोळा केली जात आहे.

या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, ऑनलाईन गेमिंग किंवा गुंतवणुकीच्या आकर्षक ऑफरवर विश्वास ठेवण्यापूर्वी नागरिकांनी संबंधित माहितीची खातरजमा करावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख