मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Sunday, 8 November 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

गडदरवाडीत शेतीच्या वादातून राडा! घराचे कुलूप तोडून सहा जणांचा धुडगूस; टीव्हीसह घरातील साहित्याची तोडफोड, एक लाखांचे नुकसान

mnewsmarathi 08 Nov 2026 1 मिनिट वाचन 3,963 वाचन

 प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील गडदरवाडी येथे शेतीच्या वादातून झालेल्या भांडणाचे रूपांतर हिंसक प्रकारात झाले. सकाळी झालेल्या वादाचा राग मनात धरून रात्री सहा जणांनी एका कुटुंबाच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील टीव्ही, गिरणी, भांडी, कपाट आणि दिवाण यांची तोडफोड करून अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान केल्याची फिर्याद वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोज नथुराम भोसले (वय ३८, रा. गडदरवाडी) यांचे नातेवाईक प्रभुनी काळे आणि प्रणव काळे यांच्यासोबत ७ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शेतीच्या कारणावरून वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून रात्री सुमारे अकरा वाजता सहा जणांनी फिर्यादी यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केल्याचा आरोप आहे.

घरात घुसल्यानंतर आरोपींनी टीव्ही, गिरणी, भांडी, कपाट आणि दिवाण यांची तोडफोड केली. यामध्ये अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच घरातील पाणी आणि पिठात लघवी करून घरभर अस्वच्छता केल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर फिर्यादी यांना शिवीगाळ करून ‘तुम्हाला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी फिरोज भोसले यांच्या फिर्यादीवरून कमलाकर नथुराम भोसले, सिंधू कमलाकर भोसले, प्रभुनी विनायक काळे, प्रणव विनायक काळे, कुसुम राकेश शिंदे आणि सुजित कमलाकर भोसले (सर्व रा. गडदरवाडी) यांच्याविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस हवालदार शेलार करीत आहेत. शेतीच्या वादातून घरापर्यंत पोहोचलेल्या या प्रकारामुळे गडदरवाडी परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi