वडगाव निंबाळकर, प्रतिनिधी : वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपत माणुसकीचे दर्शन घडविले. मुर्टी परिसरात भटकत असलेल्या एका मनोरुग्ण महिलेला सुरक्षित ताब्यात घेऊन फलटण तालुक्यातील गोखळी येथील मनोबल आसरा फाउंडेशनमध्ये दाखल करण्यात आले.
सुमारे 45 वर्षीय ही महिला मुर्टी परिसरात अनेक दिवसांपासून भटकत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शरद भगत यांच्या निदर्शनास आले. महिलेची मानसिक अवस्था ठीक नसल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली.
माहिती मिळताच महिला पोलीस शिपाई तोडेकर मॅडम, पोलीस शिपाई यादव आणि पोलीस शिपाई परगे यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित महिलेला सुरक्षित ताब्यात घेतले. त्यानंतर आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून महिलेला फलटण तालुक्यातील गोखळी येथील मनोबल आसरा फाउंडेशनमध्ये दाखल करण्यात आले.
या मानवतावादी कार्यामुळे वडगाव निंबाळकर पोलिसांच्या संवेदनशीलतेचे आणि तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत असून, सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून केलेल्या या कार्याबद्दल पोलीस पथकाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.












