प्रतिनिधी –
मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे यांनी मोटार वाहन कायदा, १९८८ चे कलम ११५ तसेच शासन गृह विभागाच्या दि. १९/०५/१९९० रोजीच्या अधिसूचनेनुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा – सन २०२६ निमित्त बारामती तालुक्यातील निरा–बारामती मार्गावरील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे बारामती तालुक्यात दि. १४/०७/२०२६ ते दि. १६/०७/२०२६ या कालावधीत आगमन व मुक्काम असल्याने पालखी मार्गावर भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळणे, अपघातांना प्रतिबंध करणे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे या उद्देशाने पुढीलप्रमाणे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
वाहतूक बदल पुढीलप्रमाणे राहील :
१) दि. १४/०७/२०२६ व दि. १५/०७/२०२६
निरा कॉर्नर – निंबूत येथून जाणारी वाहतूक मोरगाव रोड – चौधरवाडी फाटा – चौधरवाडी – करंजेपूल या पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल.
२) दि. १६/०७/२०२६
निरा–बारामती रोडवरील वाहतूक कटिणपूल – बजरंगवाडी – कोऱ्हाळे खुर्द – होळ – वाणेवाडी – करंजेपूल – निरा या पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल.
पोलिस प्रशासनाचे जनतेस आवाहन :
वाहनचालकांनी व नागरिकांनी संबंधित वाहतूक बदलाची नोंद घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा. वाहतूक पोलीस व बंदोबस्तावरील अधिकारी/अंमलदार यांच्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. पालखी सोहळा शांततापूर्ण, सुरक्षित व सुरळीत पार पडण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी API जीवन मोहिते यांच्यावतीने करण्यात आले आहे.












