जिल्हा विधी सेवा प्राधिकणाच्यावतीने बांधकाम कामगारांसाठी विधी साक्षरता शिबिर संपन्न

माझा जिल्हा

प्रतिनिधी

येरवडा येथे जिल्हा विधि सेवा प्राधिकरण आणि बांधकाम मजुरांच्या अडचणींवर काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांच्या सार्वजनिक अंकेक्षणबाबत विधी साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आले.

 यावेळी जिल्हा विधी प्राधिकरणाच्या सचिव न्या. मंगल कश्यप, पुणे जिल्हा कामगार उपायुक्त अभय गीते, सहाय्यक कामगार आयुक्त मुजम्मील मुजावर, बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे लेखा अधिकारी बाबासाहेब जाधव, ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव आदी उपस्थित होते.

बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच कामगार विभागाला दिलेल्या लिखित तक्रारी सोडवण्यासाठी आवश्यक ती मदत कायदेशीर मार्गदर्शन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येईल, असे श्रीमती कश्यप यांनी यावेळी सांगितले.

श्री. गिते म्हणाले, जिल्ह्यास्तरीय प्रलंबित असणारे नवीन व नुतनीकरणाबाबतचे नोंदणी अर्ज महिना अखेरपर्यंत निकाली काढण्यात येईल. कामगार कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीचे लवकरात लवकर निराकरण करण्यात येईल. नवीन कामगार नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी तसेच जलद गतीने योजनांच्या लाभ नागरिकांना मिळावा यासाठीच्या प्रशासकीय बाबींचा पाठपुरावा करण्यात येईल.

ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी बांधकाम कामगार किंवा असंघटीत कामगारांची नोंदणीविषयीदेखील व्यापक प्रचार, प्रसार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करून पात्र कामगारांना नोंदणी करुन योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

 सर्वोच्च न्यायालयाच्या सन २०१८ मधील इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाविषयी दिलेल्या निकालातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार पुणे शहराच्या येरवडा व विश्रांतवाडी भागातील इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्थांनी बांधकाम कामगारांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणातर्फे पुढाकार घेण्यात आला.

कामगारांनी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करतांना येणाऱ्या तसेच योजनेंचा लाभ घेतांना येणाऱ्या अडचणी वेळी मांडण्यात आल्या. त्या अनुषंगाने उत्तरे देण्यात आली. कामगार नेते सुभाष भटनागर, आय.एल.एस. विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक अॅड. नितीश नवसागरे, सफर संस्थेच्या संस्थापिका रक्षिता स्वामी यांनीही यावेही विचार मांडले.