प्रतिनिधी
पुणे, दि.२३: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय संचार ब्यूरो प्रादेशिक कार्यालय पुणे व श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष आणि आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ या विषयांवर आधारित बहूमाध्यम प्रदर्शनाचे आयोजन श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी गड ता. पुरंदर येथे २४ ते २८ जानेवारी २०२३ या कालावधीत करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील १८५७ ते १९४७ या कालखंडातील महत्वाच्या घटना-घडामोडी आणि महान स्वातंत्र्यसेनानी यांची जीवनगाथा अत्यंत संक्षिप्त माहिती आणि बहूमाध्यमातून दर्शविण्यात येणार आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेने २०२३ हे वर्षे आंतरराष्ट्रीय तृणधान्य पौष्टिक वर्ष म्हणून घोषित केले आहे. यानिमित्ताने तृणधान्यातील पौष्टिक घटकांची माहिती नागरिकाला होण्यासाठी ज्वारी, बाजरी, नाचनी, वरई, राळ, राजगिरा आदी तृणधान्यांची माहिती या प्रदर्शनात दर्शविण्यात येणार आहे. या प्रदर्शनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य असून सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यत सुरु राहणार आहे.
या प्रदर्शनाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद पुणे यांच्या अंतर्गत असलेल्या विभागाद्वारे शासनाच्या उपक्रमांची माहिती देणारे दालन असतील. अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये आणि सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी पी. कुमार यांनी केले आहे.