केंद्रीय कृषि सहसचिवांची पुरंदर तालुक्यातील प्रक्रिया उद्योगांना भेट

माझा जिल्हा

प्रतिनिधी

बारामती, दि. २५: भारत सरकारच्या कृषि विभागाचे सहसचिव तथा राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डचे व्यवस्थापकीय संचालक प्रियरंजन दास यांनी काल पुरंदर तालुक्यातील विविध प्रक्रिया उद्योग व एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत प्रकल्पांना भेट दिली.

यावेळी राज्याचे फलोत्पादन संचालक कैलास मोते, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानचे संचालक के. एन. वर्मा, राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डचे संचालक ए. के. सिंग, उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, तालुका कृषि अधिकारी सूरज जाधव आदी उपस्थित होते.

सहसचिव प्रियरंजन दास यांनी जाधववाडी येथील अंजीर, पेरू व आंबा ब्रेडस्प्रेड व इतर उत्पादन करणारी पुरंदर हायलँड शेतकरी उत्पादक कंपनी, मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना अंतर्गत मंजूर व २३ प्रकारच्या फळ पिकांवर प्रक्रिया करणारे श्रीकृष्ण कोल्ड स्टोरेज व एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत लाभ घेतलेल्या बाळासाहेब झेंडे दिवे व मुरलीधर झेंडे दिवे यांच्या प्रक्षेत्रावरील अंजीर लागवड या ठिकाणी भेट देवून प्रकल्पांची माहिती घेतली.

श्री. दास यांनी पॅकहाऊसचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नमूद करून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत विविध लाभांच्या योजनांमुळे पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेल्या फायद्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीस नक्कीच फायदा होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

श्री कैलास मोते म्हणाले, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाचे गाव पातळीवर ग्रेडिंग, पॅकेजिंग व मूल्यवर्धन करणे सोयीस्कर झाले आहे. त्यामुळे उत्पादित मालाला योग्य तो बाजारभाव मिळून अतिरिक्त उत्पादित मालाची प्रक्रिया करणे शक्य झाले असून जागतिक बाजारपेठेत पुरंदर तालुक्याची ओळख निर्माण झाली आहे. पुरंदर तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी सासवडचे मंडळ कृषी अधिकारी शेखर कांबळे, कृषी पर्यवेक्षक गणेश जगताप, कृषी सहायक योगेश पवार आदी उपस्थित होते.