प्रतिनिधी
पुणे, दि. २७ : भारत निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यातील २१५- कसबा पेठ व २०५- चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या तारखेत बदल केला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार २७ फेब्रुवारीऐवजी रविवार २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
आमदार मुक्ता शैलेश टिळक यांच्या निधनामुळे कसबा पेठची, तर आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १८ जानेवारी रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामध्ये बदल करण्यात आलेले प्रसिद्धीपत्रक २५ जानेवारी रोजी जारी करण्यात आले आहे.
सुधारित कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार ३१ जानेवारी २०२३ रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३ उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असेल. प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी बुधवार ८ फेब्रुवारी २०२३ रोजी होईल. शुक्रवार १० फेब्रुवारी २०२३ उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर रविवार २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होईल. गुरुवार २ मार्च २०२३ रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती प्र. उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली आहे.
०००००