प्रतिनिधी सोपान कुचेकर
भारतीय यात्रेकरूंची हज यात्रा भारतात आणि सौदी अरेबियात सुविहीत, सुरक्षित आणि आरामदायी व्हावी यासाठी, भारत सरकार व्यापक व्यवस्था करते. भारतीय हज यात्रेकरूंच्या सुरक्षा, प्रवास, मुक्काम आणि आरोग्यविषयक व्यवस्थेचा यात समावेश आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हज समित्या, भारतीय हज समिती, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, जेद्दाहमधील भारताचे महावाणिज्य दूतावास यासह विविध संबंधितांच्या समन्वयाने ही व्यवस्था केली जाते.
उपरोक्त संबंधित घटकांसोबत हज व्यवस्थापनावर विविध संवादात्मक सत्रे आयोजित करून, यावर्षी हज 2023 ची तयारी मंत्रालयाने अगोदरच सुरू केली होती. यात्रेकरूंच्या निवडीसाठी योग्य ऑनलाइन प्रक्रियेसह सर्व आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध असल्याची खातरजमा करण्यात आली आहे. संबंधितांसाठी हज 2023 ची तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे देखील अंतिम केली असून 06.02.2023 रोजी जारी केली आहेत. ती इथे उपलब्ध आहेत
https://www.minorityaffairs.gov.in/sites/default/files/HAJ-policy.pdf.
भारतीय हज समितीने हज 2023 साठीचा अर्ज विनामुल्य केला आहे. व्हिआयपी/मान्यवर व्यक्तींचा कोटा रद्द केला असून महिला यात्रेकरू, लहान मुले, दिव्यांगजन आणि वृद्धांसाठी विशेष व्यवस्था केली जाणार आहे.
केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री एस. स्मृती झुबिन इराणी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.