प्रतिनिधी
शासकीय मान्यता प्राप्त अनुदानित व कायमस्वरूपी विनाअनुदानित दिव्यांग विशेष शाळा, कर्मशाळामधील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या, प्रशिक्षणार्थ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी येथे १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता आयोजन करण्यात येणार आहे.
दिव्यांग कल्याण आयुक्तालय, क्रीडा संचालनालय महाराष्ट्र राज्य व श्री समर्थ व्यायाम मंडळ इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थी, प्रशिक्षणार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना खेळात संधी मिळावी यासाठी २०२२-२३ वर्षाच्या या स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. राज्यातील राज्यातील ३६ जिल्ह्यातील २ हजार २१५ दिव्यांग विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होणार आहेत. दिव्यांगांच्या प्रवर्गानुसार विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा होणार आहेत. त्यामध्ये अंध, कर्णबधिर, मतिमंद, अस्थीव्यंग, बहुविकलांग प्रवर्गातील ८ ते १२ वयोगट, १२ ते १६ वयोगट, १७ ते २१ वयोगट, व २२ ते २५ या वयोगटात स्पर्धा होणार आहेत.
या स्पर्धेत विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, दिव्यांगांच्या विषयी कायदे, महत्वाच्या तरतूदी, राज्यात राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण अभियान, सुधारित शाळा संहिता, योजना आदीबाबत परिसंवाददेखील आयोजित करण्यात येणार आहे. आज राज्यभरातील दिव्यांग विद्यार्थी पुण्यात दाखल झालेले आहेत.
या स्पर्धांचे नियोजन करण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांची मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
*दिव्यांग कल्याण आयुक्तांनी स्पर्धेच्या तयारीचा घेतला आढावा*
दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी दिव्यांग मुला मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेबाबत आढावा घेतला. यावेळी दिव्यांग कल्याण विभागाचे उपायुक्त संजय कदम, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार, समर्थ व्यायाम मंडळाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर आदी उपस्थित होते.