ऊसतोडणी मजुरांसोबत कारखान्यावर अनेक मुले कधी फडात ऊस तोडताना, कधी कोप सांभाळताना तर कधी भावंड सांभाळताना दिसतात. सोमेश्वर कारखान्याने ही मुले शिक्षणातील प्रवाहापासून तुटू नयेत यासाठी ‘कोपीवरची शाळा’ हा उपक्रम राबविला. या उपक्रमात चालू हंगामात ६ ते १८ वयोगटातील २७८ मुले सहभागी झाली होती. सलग पाच महिने दररोज सायंकाळी थेट कोप्यांवर जाऊन या मुलांना शिक्षण देण्यात आले, अशी माहिती सोमेश्वरचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.
येथील सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखाना कार्यस्थळाजवळ उतरणाऱ्या ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना शिक्षण मिळवून देण्याचा निर्णय घेतला. यासाठी मानधन तत्वावर सात अनुभवी शिक्षक नेमण्यात आले. हे शिक्षक मुलांच्या व पालकांच्या सोयीनुसार दररोज सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत कोप्यांवर जाऊन सात वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यासवर्ग घेतात. मागील हंगामात सुमारे तीनशे मुलांना याचा लाभ झाला होता. चालू हंगामात केलेल्या सर्वेक्षणात ० ते १८ वयोगटातील ४५९ मुले आढळून आली होती. त्यामध्ये ० ते ५ वयोगटात अंगणवाडी, बालवाडीची १८१ मुले आढळली. ६ ते १४ वयोगटात २२० तर १५ ते १८ वगोयटात ५८ मुले आढळली. सदर ५८ मुलांचा वर्गानुसार अभ्यास घेण्यात आला. तर शिक्षण हक्क कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील मुलांची कारखान्यावर आल्यावर लेखन-वाचन चाचणी घेण्यात आली. यावेळी पूर्वतयारीत ७३, मुळाक्षर गटात ४१, बाराखडी गटात १८, जोडाक्षर गटात ३७ तर समजपूर्वक वाचन गटात १३ मुले आढलली होती. ३८ मुले चाचणीसाठी उपलब्ध नव्हती. हंगाम संपताना केवळ २७ मुलांचा स्तर बदलला नव्हता. पूर्वतयारीतून मुळाक्षरामध्ये ५४, मुळाक्षरातून बाराखडीत ४२, बाराखडीतून जोडाक्षरात १७, जोडाक्षरातून समजपूर्वक वाचनात २५ मुले गेली. यामुळे नव्वद टक्के मुलांची प्रगती या उपक्रमामुळे होऊ शकली. हंगामाच्या शेवटी अन्य कारखान्यांवरील मजूर ऊसतोडीसाठी उपलब्ध झाले त्यांच्याही ४८ मुलांना अभ्यासवर्गाचा लभ झाला. जुन्या कपड्यांचे वाटप करून व स्नेहसंमेलन घेऊन अभ्यासवर्घाचा नुकताच समारोप करण्यात आला.
कारखान्याचा हंगाम मार्चअखेर बंद झाल्यामुळे आता अभ्यासवर्गातील सर्व मुले गावी जाऊन आपापल्या मूळ जिल्हा परिषद शाळांमध्ये आत्मविश्वासाने परीक्षा देऊ शकणार आहेत आणि चांगल्या गुणांनी पुढील वर्गात जाणार आहेत, अशी माहिती समन्वयक संतोष शेंडकर यांनी दिली.
शिक्षणासोबत दर शनिवारी मुलांसोबत खेळ-गाणी-कला याचा समावेश असणारा बालमंच घेण्यात आला. याशिवाय प्रजासत्ताक दिन, बालिका दिन, शिवजयंती अशा उपक्रमांशिवाय हस्तकला, चित्रकला, खेळाच्या स्पर्धाही घेण्यात आल्या. सदर मुलांचे स्नेहसंमेलनही उत्साहात पार पडले. तालुक्याच्या बालविकास प्रकल्पाच्या सहकार्याने अंगणवाडीच्या मुलांना पोषण आहार वाटप करण्यात आले. नजीकच्या जिल्हा परिषद शाळा, सोमेश्वरनगर येथे वीस तर सोमेश्वर विद्यालयात दहा मुलांनी शिक्षण घेतले. जिल्हा शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी संजय जाधव उपक्रमास भेट देऊन मार्गदर्शन केले. साखर आयुक्त शेखर गायकवाड, सिने अभिनेते नागराज मंजुळे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच शिक्षणाशिवाय मजुरांसाठी आरोग्य शिबिर, स्तनदा व गर्भवती मातांना आरोग्य विभागामार्फत आहार व लसीकरण राबविण्यात आले. परिसरातील संवेदनशील लोकांनीही शालेय साहित्य, कपडे यासाठी सहभाग दर्शविला, असेही जगताप यांनी सांगितले.