प्रतिनिधी
गतवर्षीचा झालेला मान्सून तसेच चालू वर्षातील एल निनोचा प्रभाव, हवामान खात्याचे अंदाज लक्षात घेऊन या वर्षीच्या खरीप हंगामाचे नियोजन करावे. शेतकऱ्यांचा होणारा पीकांवरील उत्पादन खर्च कमी करुन पीकांची उत्पादकता वाढविण्याबाबत कृषि विभागाने प्रयत्न करावेत, सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम २०२३ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषि विकास अधिकारी अनिल देशमुख, अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना देऊन डॉ. देशमुख पुढे म्हणाले, कृषि निविष्ठांची गुणवत्ता तपासावी तसेच पुरेसा पुरवठा करावा. शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी कार्यवाही करावी. जिल्ह्यात ऊस पिकाचे क्षेत्र विचारात घेता उत्पादकता वाढविण्यासाठी हुमणी नियंत्रण कार्यक्रम, ऊस पाचट अभियान यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. केंद्र व राज्य शासनाच्या कृषि विभागाशी निगडीत असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन शेतकऱ्यांना लाभ देण्यावर भर द्यावा.
‘पीएम किसान’ योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची प्रलंबित ई-केवायसी प्रक्रिया येत्या दोन महिन्यात अभियानस्तरावर पूर्ण करावी. त्यासाठी गावनिहाय याद्या तयार कराव्यात. पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्याची उत्पादकता आणि क्षेत्र वाढविण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशा सूचना डॉ. देशमुख यांनी दिल्या.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी काचोळे यांनी सदारीकरणाद्वारे २०२३-२४ च्या खरीप हंगाम नियोजनाची माहिती दिली. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी तृणधान्ये १ लाख ३० हजार ४५६ हेक्टर, गळीत धान्ये २ लाख १३ हजार ४०६ हेक्टर, कडधान्ये २६ हजार ६९०, नगदी पीके ६७ हजार ४९६ हेक्टरवर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन आहे. एकूण ३० हजार क्विंटल बियाण्याची आवश्यकता असून त्याप्रमाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. खतांचे २ लाख २ हजार ४५० टन आवंटन असून ९३ हजार ३३७ टन खते उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले.
कृषि विस्तार कार्यक्रमाअंतर्गत जमीन सुपिकता निर्देशांक शिफारशी नुसार खतांचा वापर, बीज प्रकिया प्रात्याक्षिकांची मोहिम स्वरुपात अमंलबजावणी, चारसुत्री भात लागवड कार्यक्रम, क्रॉपशॉप सर्व्हेक्षण, शेतीशाळा, पीक स्पर्धेचे आयोजन, नाडेप, गांडुळ खत युनिट उभारणी, फळबाग लागवडीस प्रोत्साहान, महाडीबीटी वेबपोर्टलवरील शेतकऱ्यांची नोंदणी आदीबाबत यावेळी माहिती देण्यात आली.
आत्माचे संचालक श्री. हिरेमठ म्हणाले, कृषि व संलग्न प्रात्यक्षिके, प्रशिक्षणे, शैक्षणिक सहली, शेतीशाळा, प्रदर्शने आदी बाबींसाठी २०२२-२३ या वर्षात ३३३ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून ३२८ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. सन २०२३-२४ या वर्षात २२७ कोटी ३७ लाख रुपये लक्षांक देण्यात आला आहे.
यावर्षी ४ लाख ३२ हजार ८८२ खातेदारांना ४ हजार २५९ कोटी रुपयांचा कर्जपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्री. कारेगावकर यांनी दिली.