प्रतिनिधी
‘पर्यावरणाप्रती कृतज्ञता-वृक्षारोपण व संवर्धन’ या अभियानाअंतर्गत सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्यावतीने बारामती तालुक्यातील मोरगाव येथे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या हस्ते २० हजारापेक्षा अधिक वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला.
सा. बां. (वैद्यकीय) उपविभाग बारामतीच्यावतीने आयोजित कार्यक्रमाच्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे आदी उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणाले, निसर्गाचे आपण देणे लागतो, निसर्गास आपण काहीतरी दिले पाहिजे या हेतूने रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि शासकीय इमारतींच्या परिसरात जागा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी झाडे लावून त्यांचे जतन आणि संवर्धन करावे अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त सचिव मनिषा म्हैसकर यांनी दिल्या. त्यानुसार हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांनी किमान १० फूट उंचीचे २० हजारापेक्षा अधिक वृक्ष लागवड आणि संगोपन करण्याचा प्रादेशिक विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून संकल्प केला आहे. यामध्ये स्वदेशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करणे हा या वृक्षारोपण मोहिमेचा मुख्य हेतू आहे.
या मोहिमेअंतर्गत वृक्ष लागवडीसाठी १० ते १२ फूट उंचीच्या वैशिष्टपूर्ण झाडांची निवड आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथील नर्सरीमधून करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, कडुलिंब, सोनचाफा, कदंब, बहावा, आंबा, मोहोगणी, कैलासपती आदी वृक्षांची लागवड करुन शाश्वत आणि हरित पर्यावरण करण्याचा संकल्प केला आहे. या ठिकाणी किमान ५ किलोमीटर लांबीमध्ये, रस्त्याच्या दोन्ही बाजूला १० मीटर अंतरावर हे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रजातीच्या झाडाची एक वेगळी वातावरण निर्मिती व्हावी या अनुषंगाने ५०० मीटर पर्यंत एकाच प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यात येईल, असेही श्री. चव्हाण म्हणाले.
श्री. चव्हाण यांनी यावेळी १ हजार झाडे देण्याचे जाहीर केले. अधीक्षक अभियंत्यांकडून प्रत्येकी ४००, कार्यकारी अभियंत्यांकडून प्रत्येकी २००, उपअभियंता प्रत्येकी ७५, शाखा अभियंता प्रत्येकी ४०, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक १० तर प्रशासकीय कर्मचाऱ्यांकडून इच्छेनुसार वृक्षारोपण करण्यात येईल व पुढील ३ वर्षे ती झाडे जगविण्यात येतील.