प्रतिनिधी – फिरोज भालदार
जालना जिल्ह्यातील अंरतवली सराटी या गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला होता. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटले असतानाच बारामती शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी याचे तीव्र पडसाद पडल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सहकाऱ्यांसह उपोषण सुरू केले होते. हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सुरू होते. या आंदोलनास जरांगे यांना ग्रामस्थांनीही पाठिंबा दिला होता. आंदोलक मनोज जरंगे पाटील यांची प्रकृती खालवत चालल्याने उपोषण मागे घेण्याची विनंती प्रशासनाने केली होती मात्र ते उपोषणावर ठाम होते.याच वेळी पोलिसांनी आंदोलनात सहभागी असणाऱ्या तरुणांवर, स्त्रियांवर, लहान मुलांवर व तसेच वृद्धांवर कुठलीही दया व क्षमा न दाखवता अंधाधुंद लाठीचार्ज केला. सरकारच्या आदेशावरून लाठीचार्ज करुन हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता. या लाठीचार्जनंतर याचे तीव्र पडसाद जालना जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी उमटत आहेत.
या घटनेचे तीव्र पडसाद बारामती शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात ही उमटले आहेत. सोमवारी (दि ४) बारामती शहरात मराठा संघटनांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला, सोमवारी बारामती शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही याचे पडसाद अनेक गावांमध्ये उमटल्याचे चित्र पहायला मिळाले .बारामती शहर व ग्रामीण पोलिसांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आले होते.