आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत अत्याधुनिक औषधोपचार पद्धती देशभरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवली जात आहे- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ . भारती पवार

राजकीय

प्रतिनिधी

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत अत्याधुनिक औषधोपचार पद्धती देशभरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवली जात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ . भारती पवार यांनी आज पुण्यात दिली. इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्री तर्फे आयोजित तीन दिवसांच्या आंतर राष्ट्रीय परिषदेत दुसऱ्या दिवशी त्यांनी उपस्थित प्रतिनिधीना मार्गदर्शन केले, त्यावेळी त्या बोलत होत्या.जगभरातील बहुतेक भागात मौखिक आरोग्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे प्रारंभीच स्पष्ट करून डॉ . पवार पुढे म्हणाल्या की शरीराच्या एकूण आरोग्याच्या दृष्टीने मौखिक आरोग्य अतिशय महत्व पूर्ण मानले पाहिजे.

त्यासाठीच केंद्र सरकारने संपूर्ण देश भरात राष्ट्रीय मौखिक आरोग्य अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे. अन्य गंभीर आजारांप्रमानेच मौखिक आरोग्याशी संबंधित व्याधींवर प्रगत उपचार केले जावेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे देशवासीयांना घरपोच अत्याधुनिक उपचार मिळावेत हा मुख्य उद्देश असून गेल्या 8 वर्षांच्या कालावधीत वैद्यकीय व्यवसायासाठी अनुकूल वातावरण देशात निर्माण झाल्याचे त्या म्हणाल्या .

आयुष्यमान भारत या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत देशाच्या ग्रामीण भागात आणि गाव खेड्यांपर्यंत अत्याधुनिक वैद्यकीय सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत आणि आता कोरोना पश्चात काळात अत्यावश्यक पायाभूत वैद्यकीय सुविधा सर्वदूर पोचवण्यासाठी आयुष्यमान भारत पायाभूत सेवा उपक्रम राबवला जात आहे त्यातून आगामी पाच वर्षात सर्वांसाठी आरोग्य ही संकल्पना साकार होईल असा विश्वास डॉ. पवार यांनी यावेळी व्यक्त केला.डिजिटल देंतिस्ट्री ही रुग्णांसाठी कमी वेदना देणारी आणि अधिक अचूक उपचार पद्धती असल्यानेच भविष्यात ती क्रांतिकारी उपचार पद्धती ठरेल, व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी देखील त्याचा उपयोग होत असल्याने हे उपचार करून घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे डॉ . पवार यांनी सांगितले .

इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्री च्या ॲप चे उद्घाटन यावेळी डॉ . पवार यांच्या हस्ते करण्यात आले 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत प्रगत आणि अत्याधुनिक दंतोपचार यावर विचार मंथन होत आहे