विद्यार्थ्यांनी आनंद देणारे करिअर निवडावे…….. प्रा. डॉ. अजय दरेकर

माझा जिल्हा

प्रतिनिधी

नीरा :विद्यार्थ्यांनी आपले करिअर निवडताना आनंद देणाऱ्या करिअरचा विचार करावा. करिअर निवडताना पैसा, पद आणि प्रतिष्ठा यापेक्षा जगण्यातील आनंद मिळविणे महत्वाचे आहे.रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय व किलाचंद कनिष्ठ महाविद्यालयात 11- 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. अजय दरेकर बोलत होते. या विशेष मार्गदर्शन प्राचार्य श्री.कोकरे ए.ए.,ज्येष्ठ शिक्षिका कोल्हे व्ही.बी.,शिक्षक. आळतेकर व्ही.आर.,बर्गे एस. एम. पांगरेकर एस.एल.,श्रीमती.शिंदे व्ही.बी.,बोराटे ए. ए.,श्री.रामदास राऊत यांच्या संयुक्त प्रयत्नातून करियर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ अजय दरेकर पुढे म्हणाले की,

अलीकडील काळात पालक आणि शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये गुणांची शर्यत लावतात आणि त्यांच्या जगण्यातील आनंद हिरावून घेण्याचे पाप करतात. पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी मैलाचा दगड होऊन विद्यार्थ्यांना मार्ग दाखविण्याचे काम करावे मात्र हे करीत असताना विनाकारण विद्यार्थ्यांवर आपल्या अपेक्षा पालक आणि शिक्षकांनी लादण्याचे काम करू नये. विद्यार्थ्यांनी आपले करिअर निवडताना काळाचे भान ठेऊन निवड करावी. आज सर्व क्षेत्रात संधी आहेत त्या संधिंचा शोध प्रत्येक विदयार्थ्याने घेतला पाहिजे.आयत्या माहितीवर आपल्या आयुष्याचे गणित मांडण्याऐवजी आपल्या गणितासाठी लागणारी माहिती आपण मिळवली पाहिजे.

मेडिकल आणि कॉम्पुटर इंजिअरिंग शिवाय आज अनेक क्षेत्रात अतिशय चांगल्या संधी आहेत, अगदी इंजिअरिंग मध्येही कॉम्पुटर इंजिअरिंगपेक्षा चांगल्या शाखा आहेत. आपल्याकडे समाजात डॉक्टर इंजिनिअर यांना मानाचे स्थान दिले जाते आणि इतरांना दुय्यम वागणूक दिली जाते. त्यामुळेच समाजात कॉम्पुटर इंजिअरिंगला जास्तीचे महत्व देताना तरुणांच्या तारुण्याचा आणि सामाजिक विकासाचा बळी दिला जातो.विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखाच्या विद्यार्थ्यांचे सामाजिकीकारण होण्यात अडचणी निर्माण होतात परिणामी या क्षेत्रातील लोक व्यसनांच्या आहारी जातात, अनेकांचे कौटुंबिक वाद विवाद निर्माण हॊतात. या वादाचे समायोजन होण्यासाठी, ताण तणावांचा निचरा करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नाही म्हणून अनेक तरुण अकली वृद्ध होतात अथवा आपल्या आयुष्याची गणिते चुकवतात.

आपल्या आयुष्यात आपण आज कोणामुळे आहोत याचे भान प्रत्येक विद्यार्थ्याने ठेवले पाहिजे त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती युवराज संभाजी महाराज,क्रांतिसूर्य जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीमाई, विश्वभूषण भारतरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल केली पाहिजे. आजच्या समाजाला चांगल्या डॉक्टरची जशी गरज आहे तशीच गरज चांगल्या वकिलाचीसुद्धा आहे, चांगल्या इंजिनिअर बरोबर चांगला शिक्षक-प्राध्यापक लागणार आहे,उत्तम शेतकऱ्यासोबत नितिवान व्यापाऱ्यांची आवश्यकता सामाजाला असतेच असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यास करावा, वाचन करावा, खेळ खेळून शरीर यष्टी कमवावी. कोणी सैन्यात जावे, सैनिक अथवा पोलीस -सैन्य दलातील अधिकारी- कर्मचारी व्हावे तर कोणी प्रशासकीय अधिकारी व्हावे.आपण कोणत्याही क्षेत्रात गेलो ततरी त्या ठिकाणी आपल्या कामाच्या माध्यमातून प्रत्येकाने आपला ठसा सोडून जावे आणि लोकांनी आपल्या कामासोबत आपल्यालाही आठवावे असे आपले काम असावे.

याप्रसंगी व्यासपीठावर रामदास राऊत, कोल्हे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.