जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे केंद्रीय जल शक्ती राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या हस्ते भूमीपूजन

राजकीय

प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाईट गावांकरता जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. या 19.71 कोटी रुपये योजनेचा भूमिपूजन समारंभ केंद्रीय जल शक्ती आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या हस्ते झाला.देशभर सुरू झालेल्या जल जीवन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्याचा निर्धार करण्यात आला असून त्याचे सुमारे 70 टक्के काम पूर्ण होत असल्याचे श्री. पटेल यावेळी आयोजित सभेत म्हणाले .

या योजनेसाठी पुरेसा निधी उपलब्ध असून प्रत्येक राज्याने त्यात पुढे येऊन जल जीवन अभियानाच्या कामांना अधिक गती देण्याचे आवाहनही श्री.पटेल यांनी केले . राज्य मंत्र्यांच्या हस्ते 35 गावांना जल जीवन मिशनचे मंजुरी पत्र देण्यात आले.शेतकऱ्यांनी शेती करताना आधुनिकीकरणाची कास धरली पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. शेतीबरोबरच प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याची गरज असल्याचे श्री . पटेल म्हणाले . कांद्यावर प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने नाशिक बरोबरच मध्य प्रदेशातील देवास इथे संशोधन चालू आहे त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. शेतीत देखील समूह शेतीचे प्रयोग व्हायला हवेत.

प्रक्रिया उद्योगासाठी सहकारी तत्वावर संस्था स्थापन करून पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले .यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.