भंडाऱ्याचा प्रसाद खाल्ल्यानंतर १५० पेक्षा जास्त जणांना विषबाधा

माझा जिल्हा

प्रतिनिधी

आजकाल सर्वत्र वेगवेगळ्या देवांच्या नावांनी, वेगवेगळ्या कारणांनी भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. भंडाऱ्यातील प्रसादरुपी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी अशा ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दीही होत असते. या भंडाऱ्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांची कोणतीही तपासणी केली जात नसल्याने काही वेळा भलतेच घडते.

नंदुरबार जिल्ह्यातील रनाळा येथे असाच प्रकार घडला. ग्रामीण भागात बाळूमामा यांच्यावर श्रध्दा असणारे बहुसंख्य आहेत. रनाळे येथे बाळूमामा यांच्या नावाने भंडाऱ्याचा कार्यक्रम मंगळवारी रात्री ठेवण्यात आला होता. बाळूमामा यांच्या नावाने ठेवण्यात आलेल्या या भंडाऱ्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. भंडाऱ्यात प्रसादरुपात भगर आमटी आणि दूध असा बेत ठेवण्यात आला होता. या प्रसादाचे सेवन केल्यानंतर काही भाविकांना त्रास सुरु झाला.

बुधवारी पहाटे दोननंतर बहुसंख्य जणांना उलटी, जुलाब आणि मळमळ, असा त्रास झाला. त्यामुळे त्यांना रनाळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आरोग्य प्रशासन तातडीने कामाला लागले. रुग्णालयात दाखल सर्वांवर औषधोपचार करण्यात आला. रुग्णालयात दाखल १५० पेक्षा अधिक रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. अद्याप ५० रुग्ण नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात तर ३० ते ३५ रुग्ण रनाळे ग्रामीण रुग्णालयात दाखल असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.