गंगाधाम फेज दोनमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाकडून पाच जणांची सुटका

माझा जिल्हा

प्रतिनिधी

गंगाधाम फेज दोन सोसायटीत सातव्या मजल्यावर सदनिकेत आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाकडून एकाच कुटुंबातील पाच जणांची सुटका करण्यात आली. सात मजली इमारतीत सातव्या मजल्यावर चार खोल्या असलेल्या एका सदनिकेत आग लागली होती .मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. जवानांनी तातडीने धाव घेतली. पाण्याचा मारा सुरु करून आग विझवण्याचा प्रयत्न सुरु केला. त्याचवेळी आतमध्ये कोणी अडकले आहे का, याची खात्री केली. बाल्कनीमध्ये कुटुंबातील पाच जण अडकून पडल्याचे निदर्शनास आले.

यामध्ये एक ज्येष्ठ महिला, दाम्पत्य आणि त्यांची दोन लहान मुले होती . जवानांनी सर्वांची सुखरुप सुटका केली. अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळवले. सदनिकेत खोलीमध्ये असणाऱ्या पेटत्या दिव्यामुळे आग लागली असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून सदनिकेतील सर्व गृहपयोगी साहित्य पूर्ण जळाले. अग्निशमन दलाची मदत वेळेवर पोहोचल्याने अनर्थ टळला. इमारतीत असलेली स्थायी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे अग्निशमन दलाच्या निदर्शनास आले. अग्निशमन दलाचे अधिकारी संजय रामटेके, प्रभारी अधिकारी कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वीस जवानांनी आग आटोक्यात आणून पाच जणांचे जीव वाचविले.