मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना मानसिक व भावनिक आधार द्या – शितल साळुंके

Uncategorized

 

सोमेश्वरनगर – मासिक पाळी ही पूर्णपणे नैसर्गिक व शास्त्रीय गोष्ट आहे. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना वेगळी वागणूक देण्यापेक्षा त्यांना आदर द्या. मानसिक व भावनिक पातळीवर आधार द्या असे मत आरोग्य तज्ज्ञ शितल साळुंके यांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात मासिक पाळी या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. यावेळी आरोग्य तज्ज्ञ हिमांशु खलाटे, श्वासरोग तज्ज्ञ डॉ जान्हवी खलाटे उपस्थित होते.
शितल साळुंके पुढे म्हणाल्या की ग्रामीण भागातील मुलींत प्रचंड क्षमता असतात मात्र योग्य मार्गदर्शन व आधार न मिळाल्याने त्यांच्यात न्यूनगंड तयार होतो. मासिक पाळीची सुरुवात होताना मुलींच्या शरीरात खूप बदल होतात अशा वेळी त्यांना आधार देण्याची गरज आहे. मासिक पाळी ही पूर्णपणे नैसर्गिक असून आपण निरोगी असल्याचे ते लक्षण आहे. शालेय विद्यार्थिनींत याबाबत जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे.
आरोग्य तज्ज्ञ हिमांशु खलाटे यांनी मासिक पाळीच्या काळात पौष्टिक व सकस आहार, शारीरिक हालचाल, व्यायाम, प्राणायामाचे महत्त्व विशद केले.
महिला दिना विषयी प्रियांका भोसले, हेमंत गडकरी यांनी माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस पी होळकर होते. प्रास्ताविक पायल कुतवळ हिने केले तर आभार संतोष जेधे यांनी मानले.