‘आयसिस’च्या दहशतवाद्यांकडून दरोडा टाकून बाॅम्बची साहित्य खरेदी; तपासासाठी दहशतवादी ‘एटीएस’च्या ताब्यात

क्राईम

प्रतिनिधी

आयसिसच्या दोन दहशतवाद्यांनी साताऱ्यातील वस्त्रदालनावर दरोडा टाकून एक लाखाची रोकड लुटल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. लुटीतून मिळालेल्या पैशातून दहशतवाद्यांनी बाॅम्बची साहित्य खरेदी केल्याचे दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या तपासात उघडकीस आले आहे.

एटीएसने गेल्या वर्षी पुणे, मुंबई शहरात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असलेल्या शहानवाज आलम खान उर्फ अब्दुल्ला उर्फ इब्राहिम (वय ३१, रा. झारखंड), महंमद युनूस महंमद याकू साकी उर्फ छोटू (वय २४, रा. रतलाम) आणि झुल्फिकार अली बडोदावाला उर्फ लाला उर्फ लालाभाई (रा. मुंबई) यांना अटक केली होती. कोथरूड पोलिसांनी दुचाकी चोरताना तिघांना पकडले होते. तिघेजण दहशतवादी कारवायात सामील असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. पुणे पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्यात आला होता. एटीएसने तपासासाठी शहानवाज, महंमद, झुल्फीकार यांना तपासासाठी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना शिवाजीनगर न्यायालयातील विशेष न्यायालयात हजर केले.

दहशतवाद्यांनी साताऱ्यातील व्यापाऱ्याला लुटल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुणे- सातारा महामार्गावरील एका वस्त्रदालनात तिघांनी ८ एप्रिल २०२३ रोजी दरोडा टाकला होता. व्यापारी रात्री वस्त्रदालन बंद करण्याच्या तयारीत होता. त्यावेळी तिघेजण वस्त्रदालनात शिरले. त्यांनी व्यापाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून गल्ल्यातील एक लाख रुपयांची रोकड लुटली होती. याबाबत व्यापाऱ्याने सातारा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

दहशतवाद्यांनी दरोडा टाकल्यावर लुटीतून मिळालेले पैसे दहशतवादी कारवायांसाठी वापरले. त्यांनी बॉम्ब तयार करण्याचे साहित्य कोठून खरेदी केले, तसेच लुटमारीसाठी पिस्तूल कोठून आणले, यादृष्टीने तपास करायचा आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करायची आहे. या तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी केली. विशेष न्यायालयाने तिघांना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.