प्रतिनिधी
अभियांत्रिकीसाठी महाविद्यालयात प्रवेश मिळून देण्याचे प्रलोभन दाखवून मुलुंड येथे राहणाऱ्या एका इसमाला ओळखीच्याच व्यक्तीने एक लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीने मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मुलुंडमधील दिनदयाळ नगर येथे वास्तव्यास असलेले अविनाश कवी (४९) यांच्या मुलीला २०२३ मध्ये माटुंगा परिसरातील एका महाविद्यालयात अभियांत्रिकीसाठी प्रवेश हवा होता. मात्र कमी गुण मिळाल्यामुळे तिला महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता. ही बाब त्यांनी एका मित्राला सांगितली. महेंद्र गमरे या महाविद्यालयात प्रवेश मिळून देईल, असे कवी यांच्या मित्राने त्यांना सांगितले. त्यानुसार कवी यांनी गमरे याची भेट घेतली. प्रवेशासाठी तीन लाख रुपये द्यावे लागतील असे गमरेने त्यांना सांगितले. कवी यांनी यावर तत्काळ होकार दर्शवत त्यांना एक लाख रुपये दिले. मात्र प्रवेशाची तारीख निघून गेली तरी कवी यांच्या मुलीला या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. याबाबत त्यांनी गमरे याच्याकडे अनेकदा विचारणा केली. मात्र याबाबत तो टाळाटाळ करू लागल्याने अखेर कवी यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.