प्रतिनिधी
पुण्यातील चाकण मधील २७ वर्षीय तरुणाने प्रेम प्रकरणातून लोणावळ्यातील राजमाची दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उजेडात आली आहे. सूर्यकांत रामदयाल प्रजापती या तरुणाचा मृतदेह तब्बल ३७० फूट खोल दरीत आढळला आहे. सूर्यकांतने आत्महत्या करण्यापूर्वी अवघ्या दोन सेकंदाचा व्हिडिओ बनवून तो घरी ठेवलेल्या मोबाईलवर पाठवला होता. याच व्हिडिओद्वारे आणि लोकेशन वरून लोणावळा शिवदुर्गच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने मृतदेहाचा शोध घेऊन आज बुधवारी बाहेर काढला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यकांत प्रजापती या २७ वर्षीय तरुणाचं चाकणमधील तरुणीबरोर प्रेमप्रकरण सुरू होतं. प्रियकर सूर्यकांतला त्याच्या प्रेयसीचं दुसऱ्या तरुणाशी प्रेमप्रकरण असल्याचा संशय होता. याच संशयामुळे नैराश्यात असलेला सूर्यकांत ०९ ऑक्टोबर रोजी घर सोडून गेला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. सुर्यकांत दुसऱ्या दिवशीही घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी चाकण पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी तांत्रिक तपास केल्यानंतर सूर्यकांतचं शेवटचं लोकेशन हे लोणावळा असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. चाकण पोलीस आणि लोणावळा पोलीस घटनस्थळी गेले. तिथे काही धागेदोरे हाती लागतात का? हे तपासण्याचा प्रयत्न केला. मध्यंतरी लोणावळ्यात खूप पाऊस असल्याने शोधमोहीम घेणं शक्य नव्हतं. टप्प्याटप्याने शोध घेण्यात आला. सूर्यकांतने आत्महत्या करण्यापूर्वी अवघ्या दोन सेकंदाचा सेल्फी व्हिडीओ चित्रित केला होता.या व्हिडीओमध्ये त्याच्या पाठीमागची हिरवीगार झाडी आणि दरी स्पष्ट दिसत होती. सूर्यकांतने त्याचा दुसरा मोबाईल घरी ठेवला होता. त्याने त्यावर तो व्हिडिओ पाठवला होता. यावरून पोलीस त्याचा शोध घेत होते.
सूर्यकांतला शोधण्याचं मोठं आव्हान पोलीस आणि शिवदुर्गच्या पथकापुढे होतं. लोणावळा शिवदुर्ग पथक देखील यावरून लोकेशनची जुळवाजुळव करत होतं. अखेर तो व्हिडिओ राजमाची येथील असल्याचं समोर आलं. व्हिडीओमध्ये पाठीमागे दिसत असलेला भाग तिथला असल्याचं स्पष्ट झालं. अखेर आज सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केली. दरीत काही फुटांवर सूर्यकांतचा मोबाईल दिसला. आणखी खाली गेल्यानंतर मृतदेहाची दुर्गंधी आली. मृतदेह त्याचा असल्याचं निश्चित झालं. राजमाची दरीत तब्बल ३७० फुटांवर सूर्यकांत चा मृतदेह आढळला. सात दिवसांनंतर सूर्यकांत चा शोध लागला होता. प्रेम प्रकरणातून सूर्यकांतने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. शिवदुर्गचे सुनील गायकवाड यांच्या पथकाने त्याचा मृतदेह शोधला.